Aditya Thakre said That Pawar will be the key person for alliance negotiations | Sarkarnama

आदित्य ठाकरे म्हणाले, यापुढे शिवसेना-भाजपच्या चर्चांसाठी मध्यस्थ म्हणून  पवार यांचेच नाव !

सुचिता करमरकर
गुरुवार, 10 जानेवारी 2019

कल्याण: शिवसेना-भाजपच्या एकत्रित भूमिकेबाबत कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांचे वक्तव्य ऐकून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी  यापुढे सेना-भाजपच्या चर्चांसाठी मध्यस्थ म्हणून आपण पवार  यांचाच विचार करणार, असे  सांगताच सभेत हास्याची लकेर उठली.   

कल्याण: शिवसेना-भाजपच्या एकत्रित भूमिकेबाबत कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांचे वक्तव्य ऐकून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी  यापुढे सेना-भाजपच्या चर्चांसाठी मध्यस्थ म्हणून आपण पवार  यांचाच विचार करणार, असे  सांगताच सभेत हास्याची लकेर उठली.   

एकीकडे भाजपचे अध्यक्ष अमित शाह शिवसेनेला पटकी देण्याची भाषा करीत असले तरी राज्यात शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांना युतीशिवाय दोघांनाही पर्याय नाही हे चांगलेच ठाऊक आहे . त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे नेते आमने सामने आले की त्यांची भाषा कशी  बदलते याचे उदाहरण  कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या एका कार्यक्रमात पाहावयास मिळाले . 

  आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती होणार की नाही याची चर्चा राष्ट्रीय पातळीवर होत आहे. हे दोन पक्ष एकत्र येतील किंवा नाही हे चर्चेअंती स्पष्ट होईल. मात्र शहर विकासात सेना-भाजप हातात हात घालून वाट चालत असल्याची ग्वाही या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एका कार्यक्रमात दिली आहे. 

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सिटी पार्कचे भूमिपूजन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. याप्रसंगी सेनेच्या मातब्बर नेत्यांसह भाजपच्या नेत्यांनीही हजेरी लावत आपण शहर विकासासाठी एकत्रच आहोत असे सांगण्याचा प्रयत्न केला. 

       युवा सेनाप्रमुखांच्या हस्ते उदघाटन होणार असल्याने या प्रकल्पाचे श्रेय सेनेकडे जाणार असे वाटल्याने भाजपचा शहराध्यक्ष पदावरील मंडळींनी हे काम आमच्याच नेत्यांच्या सहकार्यामुळे पार पडत असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. हे श्रेयवादाचे राजकारण भूमिपूजन कार्यक्रमाच्या स्टेजवरही रंगले.

 कल्याण पश्चिमेचे आमदार नरेंद्र पवार यांनी याबाबत प्रथम भाष्य केले. आपल्या भाषणात बोलताना पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिटी पार्क प्रकल्पातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले. इतकेच नाही तर शहरातील विविध विकास कामांकडे दोन्ही नेत्यांचे बारकाईने लक्ष असल्याचेही स्पष्ट केले. 

विकासासाठी सेना-भाजपचे एकत्र वचन असल्याचे सांगताना त्यांनी युतीला गाजरे दाखवली जातात असा टोलाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लगावला. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ भिवंडी लोकसभेमध्ये मोडतो. भिवंडीमध्ये भाजपचे कपिल पाटील खासदार म्हणून काम करतात. शहराच्या विकासात त्यांचेही योगदान असल्याचे पवार यांनी आवर्जून सांगितले. दोन्ही पक्ष विकासासाठी एकत्रच आहेत याची ग्वाही त्यांनी दिली. 

सेना-भाजपमध्ये मागील अनेक वर्षांपासून युती असली तरी स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते कायमच एकमेकांविरोधात धुसफुसत असतात. हे चित्र ठाणे जिल्ह्यात नवीन नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिमेतून निवडून आल्यावर नरेंद्र पवार यांनी ठाण्याचे पालकमंत्री तसेच शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना अनेकदा अंगावर घेतले आहे.

 जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव म्हणून काम करत असताना पवार यांनी पालकमंत्री शिंदे यांना शाब्दिक आव्हान दिल्याचेही पहायला मिळत आहे . राज्याचे राज्यमंत्री तसेच डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण हे याबाबतीत पिछाडीवर नाहीत डोंबिवलीतील विकास कामांचे श्रेय घेण्यासाठी अनेकदा सेना-भाजपमध्ये श्रेयवादाचे राजकारण रंगलेले पहायला मिळाले आहे. 

  सेना-भाजपच्या एकत्रित भूमिकेबाबत नरेंद्र पवार यांचे वक्तव्य ऐकून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर कोटी केली. यापुढे सेना-भाजपच्या चर्चांसाठी मध्यस्थ म्हणून आपण पवार  यांचाच विचार करणार, असे आदित्य यांनी सांगताच सभेत हास्याची लकेर उठली.

सेनेच्या या युवा नेत्याने सर्वसामान्य नागरिकांना सेनेचे राजकारण म्हणजेच समाजकारण असल्याचे उदाहरण देऊन स्पष्ट केले. निवडणुका म्हणजेच राजकारण, सत्ता म्हणजेच राजकारण असे काहीसे मत राजकारणात आल्यानंतर सुरुवातीच्या काळात असल्याचे आदित्य यांनी सांगितले. 

मात्र दोन निवडणुकांच्या मध्ये होत असलेले पाहणी दौरे, लोकांसाठी दिलेली  वचने पूर्ण करण्यासाठी केली जाणारी कामे हीच समाजकारण करण्याची संधी असून तेच शिवसेनेचे राजकारण असल्याचे आदित्य ठाकरे यांनी  सांगितले. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थित शिवसैनिकांनी टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला.

 युवा असल्यामुळे नजीकच्या भविष्यकाळात माझा देश कसा असेल किंवा कसा असावा याचे संकल्प चित्र माझ्या मनात तयार आहे त्यादृष्टीने काम करण्यासाठी राजकारणात आहोत  असे आदित्य यांनी सांगितले. 

     

संबंधित लेख