Aditya Thakre Open Discussion with Nadhik Youth | Sarkarnama

मुंबई प्रमाणेच नाशिक, पुणे येथेही 'नाइट लाइफ'चा विचार : आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला मानस

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 एप्रिल 2019

"युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मुंबईत नाइट लाइफ भूमिकेमागे 'हॉस्पिटॅलिटी' क्षेत्रातील रोजगार तिप्पट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे मुंबईत नाइट लाइफ सुरु करण्याचा प्रस्ताव मांडला. असाच विचार आता पुणे आणि नाशिक बाबत करावा लागेल," असा मानस त्यांनी व्यक्त केला.

नाशिक : "युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मुंबईत नाइट लाइफ भूमिकेमागे 'हॉस्पिटॅलिटी' क्षेत्रातील रोजगार तिप्पट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे मुंबईत नाइट लाइफ सुरु करण्याचा प्रस्ताव मांडला. असाच विचार आता पुणे आणि नाशिक बाबत करावा लागेल," असा मानस त्यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे नाशिक मतदारसंघात झालेल्या या कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी खास बसेसद्वारे मालेगाव, जळगाव या भाजपकडे असलेल्या मतदारसंघातून आले होते.

आदित्य ठाकरे यांनी तरुणाईसोबत जिव्हाळ्याच्या विषयावर काम करण्याचा मानस व्यक्त केला. निमित्त होते आदित्य संवाद उपक्रमाचे. पक्षाचे बॅनर, स्टेज, भाषणबाजी फलक नाही. रॉक बॅंड, नाशिकचे ढोलपथक, स्टेजच्या चौफेर ज्यांच्याशी संवाद साधायचा असा तरुणाईचा गराडा, फ्लड लाइटच्या प्रकाशात न्हाऊन निघालेले मैदान, पारंपरिक राजकीय पक्षांच्या मेळाव्यापेक्षा पूर्ण आगळीवेगळी रचना, जागोजागी नाश्‍ता आणि सेल्फी स्टॅण्ड अशा पूर्णतः वेगळ्या वातावरणात क्रांतिवीर व्ही. एन. नाईक संस्थेच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर आदित्य ठाकरे यांनी नाशिकच्या तरुणाईला महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या वाटणाऱ्या विषयावर बोलते केले. मेळाव्याला मालेगाव, जळगाव. येवला या भागातुनच अधिक विद्यार्थी होते. ते अधुन मधुन आपल्या नेत्याच्या नावाने घोषणाही देत होते.

खासदारांनी पाच वर्षांत केले काय
आदित्य म्हणाले, "शिक्षण हेच अनेक प्रश्‍नांचे उत्तर आहे. अभ्यासक्रम बदलाची गरज आहे. भाजपसोबत वैचारिक मतभेद होते, लोकांच्या प्रश्‍नांवर भाजपसोबत (शिवसेना) आम्ही भांडलो. प्रश्‍नांची उत्तरे मिळाल्यावरच युती केली. ही युती देशासाठी आहे, भाजप किंवा शिवसेनेसाठी नाही. नाशिकच्या खासदारांनी टेलिमेडिसिन, रस्ते, इलेक्‍ट्रिक टेस्टिंग लॅब, राजधानी एक्‍स्प्रेस, उड्डाण योजनेचा पाठपुरावा, नेट न्यूट्रॅलिटी, क्रीडासंकुल अशी कामे केली. आदिवासी भागात दर्जेदार खेळाडू आहेत. मात्र, पुरेशा क्रीडा सुविधा नाहीत. त्याविषयी आधी शिक्षण, त्यासोबत क्रीडा सुविधा असे धोरण राहील."

तत्पूर्वी बॅंड पथकाच्या गीतांचे, व ढोलपथकाचे सादरीकरण झाले. पावणेआठच्या सुमारास व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर सुमारे तासभर आदित्य यांनी उपस्थित तरुणांच्या मनातील अपेक्षा, त्यांचे प्रश्‍न जाणून घेतले. तरुणाईशी त्यांनी थेट साधलेला संवाद असे स्वरूप असलेल्या प्रश्‍नोत्तर रूपात कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या तरुण खेळाडूंचा सत्कारही करण्यात आला. तसेच उपस्थितांना व्हिजिटिंग कार्डासोबत मोबाईल नंबर देऊन सूचना कळविण्याचे आवाहन केले.

संबंधित लेख