aditya thakre | Sarkarnama

"सेल्फी पॉंईट' मुळे वाहतुकीचा अडथळा थांबेल -आदित्य ठाकरे

ब्रह्मदेव चट्टे
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

मुंबई : सेल्फी पाईंटमुळे पर्यटकांचा वाहतुकीला होणारा अडथळा थांबणार आहे. येत्या काळात संपूर्ण सीएसएमटी परिसराचे रुप हे हेरिटेज वास्तूस अनुरूप असेल असे प्रयत्न पालिका प्रशासनाकडून केले जातील असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना पालिका मुख्यालय परिसरातील वास्तूंची छायाचित्र काढता यावीत यासाठी पालिका मुख्यालयासमोर उभारण्यात आलेल्या दर्शनी गॅलरीचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते.

मुंबई : सेल्फी पाईंटमुळे पर्यटकांचा वाहतुकीला होणारा अडथळा थांबणार आहे. येत्या काळात संपूर्ण सीएसएमटी परिसराचे रुप हे हेरिटेज वास्तूस अनुरूप असेल असे प्रयत्न पालिका प्रशासनाकडून केले जातील असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना पालिका मुख्यालय परिसरातील वास्तूंची छायाचित्र काढता यावीत यासाठी पालिका मुख्यालयासमोर उभारण्यात आलेल्या दर्शनी गॅलरीचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. याप्रसंगी पर्यावरण मंत्री रामदास कदम, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, माजी महापौर स्नेहल आंबेकर, पालिका आयुक्त अजोय मेहता, आमदार राज पुरोहित यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. 

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, या गॅलरीतून मुंबईकरांना महत्त्वाचे म्हणजे पर्यटकांना सीएसएमटी स्थानकाची हेरिटेज वास्तू, महापालिका इमारतीची हेरिटेज वास्तू यांचे फोटो काढण्याची सोय होणार आहे. तसेच, पर्यटकांना एका मध्यवर्ती ठिकाणी उभे राहून सीएसएमटी परिसर न्याहाळता येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. ठाकरे पुढे म्हणाले, त्यासाठी पदपथावरील दिवे हे सुद्धा हेरिटेज रूपातील असतील. पदपथांची रचना ही हेरिटेज या वास्तूंना अनुरूप अशीच करण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. 

मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस व पालिका मुख्यालयासमोर दर्शनी गॅलरी आता पर्यटकांना फोटो काढण्यासाठी, आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. जागतिक वारसा स्थळ असणारे छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि त्याच्या लगतच्या परिसरात अनेक पर्यटक छायाचित्रे काढत असतात. हे जागतिक वारसा स्थळ व लगतचा परिसर डोळे भरून पाहण्यासाठी किंवा येथे छायाचित्रे काढण्यासाठी दर्शनी गॅलरी नसल्याने अनेकदा पर्यटक वाहतुकीने गजबजलेल्या रस्त्यावर येऊन छायाचित्रे काढत असतात. दक्षिण मुंबईतील वाहतुकीचा ओघ लक्षात घेता ही बाब पर्यटकांसाठी धोकादायक होती. ही बाब लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या पूर्व बाजूला जोडणाऱ्या भूमिगत पादचारी मार्गाच्या वर एक 'दर्शनी गॅलरी' उभारण्याचा प्रशासकीय प्रस्ताव तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी 'ए' विभागाला दिला होता. त्यानुसार पालिकेच्या समोर असलेल्या टनेलचे असलेले पंख्याच्या वर ही दर्शनी गॅलरी उभारण्यात आली आहे. त्रिकोणी आकारच्या या दर्शनी गॅलरीतून पर्यटकांना सेल्फी काढता येणार आहेत. 

गॅलरीसाठी 90 लाख खर्च 
या दर्शनी गॅंलरीसाठी 90 लाख रु. खर्च करण्यात आला आहे. या गॅलरीची ऊंची 5 फूट असून यातून संपूर्ण परिसर पर्यटकांना पाहता येणार आहे. केंद्र सरकारने देशातील 10 महत्त्वाची पर्यटन ठिकाण जाहीर केली आहेत. यात मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनल्स समावेश आहे. याच धर्तीवर या संपूर्ण भागाचा विकास केला असून याच अनुषंगाने सीएसटी समोर ही दर्शनी गॅलरी तयार करण्यात आली आहे. 

संबंधित लेख