Aditya Thakray won young generation in Malegaon | Sarkarnama

आदित्य ठाकरेंनी जिंकली युवकांची मने !

सरकारनामा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

युवती व युवकांशी साधलेल्या संवादातून व रोड शो तसेच विविध कार्यक्रमांना रस्त्याने जातांना गाडीच्या टपावरुन हात वर करीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवकांची मने जिंकली. युथ कनेक्ट हाच त्यांचा राज्यव्यापी दौऱ्याचा प्रमुख उद्देश असल्याचे जाणवले.

मालेगाव  : " स्वसंरक्षणासाठी एका दिवसात वा अर्ध्या तासात तुम्हाला लागलीच कराटे शिकवत नाही. मात्र या शिबीरातून तुमच्या मनातील भिती कायमची दूर व्हावी, तुम्ही खंबीर व्हाव्यात ही भूमिका आहे. महिलांना व तरुणींना लक्ष्मी, सरस्वती म्हणून पाहिले जाते. कटू प्रसंग आल्यास व कोणी त्रास दिल्यास तरुणींनी कालीमाता-दुर्गा व्हावे," असे आवाहन शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज शुक्रवारी दुपारी येथे केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तालुका क्रिडा संकुलातील इनडोअर हाॅलमध्ये झालेल्या सेल्फ डिफेन्स शिबीर प्रसंगी ते बाेलत होते. विविध शाळा, महाविद्यालयातील तरुणींनी हॉल गच्च भरला होता. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, महिला आघाडीच्या ज्योती भोसले, नगरसेविका आशा अहिरे, कल्पना वाघ, युवासेनेचे विस्तारक अविष्कार भुसे आदींसह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जमिनीवरच बसकन मारली होती. मधोमध अवघ्या दोन फुट उंचीचे स्टेज साकारले होते. 

मुंबई येथून आलेल्या पाच कराटे प्रशिक्षकांनी तरुणींना स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक दाखविले. तरुणींनी त्यात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. श्री. ठाकरे यांनी तरुणींशी संवाद साधतांना त्यांना सेल्फ डिफेन्स म्हणजे काय, मनात भीती बाळगू नका, पिक्चर बघतात का, बिकट प्रसंग आल्यावर आजूबाजुला काय चालले आहे, नजीक ओळखीचे कोणी आहे का? याकडे लक्ष असू द्या असे सांगितले. 

तुमचा आवाज तुमचा शस्त्र होऊ शकतो. हल्ला झाल्यास व कोणी पाठलाग करीत असल्यास मोठ्याने ओरडा असे सांगतानाच त्यांनी एक, दोन, तीन मोजत उपस्थित युवतींना एका सुरात बचाव, बचाव असे ओरडण्यास सांगितले. यावेळी क्रिडा संकुलात सर्वत्र बचाव, बचावचा आवाज घुमला. यावेळी शहर व परिसरातील तरुणी, महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. 

युवती व युवकांशी साधलेल्या संवादातून व रोड शो तसेच विविध कार्यक्रमांना रस्त्याने जातांना गाडीच्या टपावरुन हात वर करीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवकांची मने जिंकली. युथ कनेक्ट हाच त्यांचा राज्यव्यापी दौऱ्याचा प्रमुख उद्देश असल्याचे जाणवले. कुठलीही भाषणबाजी न हाेता क्रिडासंकुलात झालेला सेल्फ डिफेन्सचा कार्यक्रम सर्वांची दाद घेऊन गेला. क्रिडा संकुलाच्या इनडोअर हॉलच्या भिंतीवर क्रेनच्या मदतीने लावण्यात आलेले ४५ बाय २० चे डिजीटल बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
 

संबंधित लेख