aditya thakray | Sarkarnama

मातोश्रीवरील ठाकरे प्रथमच लढले आणि जिंकलेही 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 8 जुलै 2017

मुंबई ः कोणतीही निवडणूक न लढण्याच्या ठाकरे कुटुंबीयांच्या वचनात काळानुसार बदल झाला. ठाकरेंच्या नव्या पिढीतल्या "आदित्य'चा निवडणुकीच्या क्षितीजावर उदय झाला आणि त्यांनी ही निवडणूक जिंकलीही!

मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेच्या आज झालेल्या निवडणुकीत आदित्य यांनी सर्वाधिक मते तर मिळवलीच त्याचबरोबर त्यांचे अख्खे 27 सदस्यांचे पॅनेलही जिंकले. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विधानसभेत सत्ता असतानाही निवडणूक लढवण्याचा कधी विचार केला नव्हता. हीच परंपरा कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कायम ठेवली; परंतु नव्या पिढीचे नवे विचार बदलाचे वारे घेऊन आले आहेत. आदित्य ठाकरे या अगोदरही मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष होते; परंतु त्या वेळी त्यांना स्वीकृत सदस्य करून या पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याच वेळी पुढच्या वेळेस निवडणूक लढविण्याचे संकेत आदित्य यांनी त्या वेळी दिले होते. त्यामुळे ठाकरे कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवत नाही या परंपरेचा उल्लेख होऊ लागला होता. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही निवडणूक लढवणे कदाचित आमच्या "डीएनए'तच नसावे, असे एका मुलाखतीत सांगितले होते; पण आदित्य ठाकरेंच्या उदयानंतर आणि आता या विजयानंतर परिस्थिती आणि परंपरा बदलण्याचे संकेत मिळाल्याचे बोलले जाते. 

मुंबई फुटबॉल संघटनेच्या आजच्या निवडणुकीत 159 क्‍लब सदस्यांनी मतदान केले. त्यातील पाच मते अवैध ठरली. 154 पैकी आदित्य ठाकरे यांना सर्वाधिक 147 मते मिळाली. प्रतिस्पर्धी गटाकडून 10 जणांचेच पॅनेल होते. त्यातील एकालाही 50 मते मिळवता आली नाहीत. ठाकरे पॅनेलमधील सर्वांनी शंभरच्या पुढे मते मिळवली. 

संबंधित लेख