adhalrao accuses ajit pawar and walase patil | Sarkarnama

बैलगाडा शर्यतीचा नाद भिकार असल्याचे अजितदादा आणि वळसे सांगत होते.. : आढळराव

निलेश शेंडे
मंगळवार, 9 एप्रिल 2019

पुणे : "बैलगाडा शर्यतीचा नाद चांगला नाही. हे भिकारपणाचे लक्षण आहे. यापासून दूर रहा, असे सल्ले दिलीप वळसे पाटील व अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिले आहेत,'' असा आरोप शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे. 

पुणे : "बैलगाडा शर्यतीचा नाद चांगला नाही. हे भिकारपणाचे लक्षण आहे. यापासून दूर रहा, असे सल्ले दिलीप वळसे पाटील व अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिले आहेत,'' असा आरोप शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे. 

आढळराव पाटील यांनी आज सकाळ आणि सरकारनामाच्या फेसबुक लाईव्हमध्ये बैलगाडा शर्यतीविषयी आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, ""ज्या ज्या वेळी बैलगाडा शर्यती बंद पडल्या, त्या त्यावेळी बैलगाडा मालक शेतकरी वळसे पाटील व अजित पवार यांच्याकडे गेले, "काही तरी करा. प्रयत्न करा,' असे त्यांना सांगितले. पण, त्यांनी शेतकऱ्यांना, "बैलगाडा शर्यतीचा नाद चांगला नाही. हे भिकारपणाचे लक्षण आहे. यापासून दूर रहा,' असे सल्ले दिलेत. तसेच, बैलगाडा शर्यती बंद करण्याच्या मागणीसाठी नगर जिल्ह्यातील ज्या प्राणी मित्र संघटनेने याचिका दाखल केली. त्या संघटनेचे कार्यकर्ते नगर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री वळसे पाटील यांच्या जवळचे होते.''

आढळराव पाटील म्हणाले, ""बैलगाडा शर्यतीमध्ये राजकारण आले. बैलगाडा शर्यत हा कधी राजकारणाचा विषय नव्हता. खासदार होण्यापूर्वीपासून मी बैलगाडा शर्यतीशी संबंधित आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद मिळवून देणारी ही स्पर्धा आहे. या शर्यतीत बैलांचे नुकसान होते. त्यामुळे मी बैलगाडा विमा कंपनी काढली. त्यातून लोकांना भरपाई देत होतो. त्यानंतर मी खासदार झालो. पण, त्यानंतर जेव्हा जेव्हा बैलगाडा शर्यती बंद झाल्या. त्या त्यावेळी मी लढलो. सन 2005 ला बैलगाडा शर्यत बंद झाली. मी कोर्टात लढलो. केस जिंकलो. सन 2011 मध्ये कॉंग्रेस सरकारने अध्यादेश काढला. त्यात बैलांचा समावेश जंगली प्राण्यांमध्ये केला. पुन्हा बैलगाडा शर्यती बंद झाल्या. मी पुन्हा कोर्टात गेलो. सन 2013 मध्ये पुन्हा बैलगाडा शर्यती चालू केल्या. त्यात सरकारने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात अपील केले. जयंती नटराजन त्यावेळी मंत्री होत्या. त्यानंतर सन 2014 मध्ये पुन्हा त्यांच्याच काळात बैलगाडा शर्यती बंद पडल्या. या सगळ्या प्रक्रियेत बैलगाडा मालकांसाठी सातत्याने भांडणारा मी आहे. कोर्टात किंवा सरकारी दरबारी मी सातत्याने प्रयत्न केले.'' 

``माझ्यावर बैलगाडी शर्यत बंदी विरोधातील आंदोलनाच्या तीन केसेस आहेत. आमदार महेश लांडगे व शरद सोनवणे यांच्यावरही बैलगाडी शर्यती आंदोलनाच्या केसेस आहेत. सर्वाधीक केसेस माझ्या नावावर आहेत. ज्यावेळी मंचरमध्ये दंगल उसळली, त्यावेळी ती दंगल शांत करत असताना, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक नागपूरवरून जिल्हा पोलिस अधिक्षकांना सांगितलं की, यांना कलम 307 नुसार आत टाका. बैलगाडा शर्यतीसाठी मी भांडतोय. पण, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कधीही आंदोलनात सहभागी झाला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने कधीही प्रयत्न केला नाही,`` असा आरोप त्यांनी केला. 

संबंधित लेख