adhalrao about shirur constituency | Sarkarnama

आढळराव लढत दुरंगी होणार म्हणतात! म्हणजे महेशदादा रिंगणात नसणार?

उत्तम कुटे
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पिंपरीः आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूरमध्ये दुरंगी लढत होईल, असे या मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये सांगितले. त्यातून लोकसभेला शिवसेना आणि भाजपमध्ये युती होईल, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव दादा आणि भाजपचे संभाव्य उमेदवार मानले जाणारे भोसरीचे महेशदादा लांडगे यांच्यातील लढतीची शक्यता धूसर झाली आहे.

लोकसभा निवडणूक काही महिन्यावर आल्याने लोकसभेतील रिपोर्ट कार्ड आढळराव यांनी पुणे जिल्हाप्रमुख राम गावडे, पिंपरी-चिंचवड महिला संघटिका सुलभा उबाळे यांच्या उपस्थितीत आज सादर केले. यावेळी त्यांनी शिरूरमध्ये शिवसेना,भाजप आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होण्याची शक्‍यता नाकारली. त्यांच्या या दाव्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसच लढतीत असल्याचे स्पष्ट झाले. भाजपचा उमेदवार रिंगणात असता तर तिरंगी लढत झाली असती.

त्यांनी पिंपरी पालिका प्रशासन व तेथील सत्ताधारी भाजपवर सडकून टीका यावेळी केली. देशातील राहण्यालायक शहरांच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवडला मिळालेल्या 69 व्या नंबरवरही त्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. तेथील भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीमुळे हे शहर शेवटून पहिले यायला हवे होते, असा टोला त्यांनी लगावला.

भोसरीतील अतिक्रमणे, गुंडगिरी खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या प्रश्‍नाचे निर्मूलन केले नाही,तर न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला. विविध विकासकामांच्या टेंडर प्रक्रियेत भाग घेतलेल्यांना धमकी देऊन आपल्याच माणसाला कामे पिंपरी पालिकेत देण्याची प्रथाच पडली असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला.

पिंपरी-चिंचवडमधील पंतप्रधान आवास योजनेत दीडशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आढळराव यांनी केला. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याने या फाईलवर त्यांनी लाल शेरा मारल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे पिंपरी पालिका राबवीत असलेली ही केंद्राची योजना अडचणीत येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पालिकेच्या साडेचारशे कोटी रुपयांच्या (भोसरीतील) रस्ते कामात नव्वद कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोपाचाही त्यांनी पुनरुच्चार केला. पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण पालिकेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे रखडल्याने वाहतूक कोंडी कायम राहिल्याचेही त्यांनी सांगितले. 

संबंधित लेख