Adani electricity's energy bills to consumers will be investigated: Anand Kulkarni | Sarkarnama

अदानी कंपनीने मुंबईकरांना जादा दरानेआकारलेल्या वीज बिलांची चौकशी : आनंद कुलकर्णी

सरकारनामा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

जास्तीची वीज देयक आकारणी आढळून आल्यास अशी रक्कम नियमातील तरतुदीनुसार व्याजासह ग्राहकांना परत करावी किंवा पुढील विद्युत देयकात समायोजित करावी.

-आनंद कुलकर्णी, अध्यक्ष

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (एमईआरसी)

मुंबई  : अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि. कडून ग्राहकांना नियमित दरापेक्षा वाढीव दराने प्राप्त झालेल्या देयकांच्या अनुषंगाने तपासणी आणि उपाययोजनांबाबत शिफारस करण्यासाठी दोन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे (एमईआरसी) अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.

याप्रसंगी आयोगाचे सदस्य मुकेश खुल्लर आणि आय. एम. बोहरी उपस्थित होते. यावेळी श्री. कुलकर्णी म्हणाले, मुंबई उपनगरातील अदानी कंपनीच्या ग्राहकांना नोव्हेंबर 2018 मध्ये नियमित दरापेक्षा वाढीव दराने विद्युत देयके प्राप्त झाली आहेत.

त्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची आयोगाने स्वयंप्रेरणेने दखल घेतली तसेच अदानी कंपनीकडून स्पष्टीकरण मागविले होते. अदानी कंपनीच्या 27 लाख ग्राहकांपैकी जवळपास 1 लाख 10 हजार निवासी ग्राहकांना सुमारे 20 टक्के वाढीव दराची वीज देयके प्राप्त झाली आहेत.

कंपनीच्या प्रतिनिधींनी आयोगासमोर उपस्थित राहून स्पष्टीकरण दिले. ऑक्टोबर महिन्यातील उच्च तापमान आणि उच्च आर्द्रता पातळीमुळे अधिक वीज वापर, मागील देय इंधन समायोजन आकारांचा (एफएसी) काही हिस्सा या वीज देयकामधून वसूल करणे,

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कडून अदानी कंपनीकडे  वितरण परवान्याच्या मालकीचे हस्तांतरण होताना कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे मीटर वाचन उपलब्ध नसणे; व त्यामुळे सुमारे साडेतीन लाख ग्राहकांची वीज देयके सरासरी वापराच्या तत्त्वावर पाठविण्यात आली. तथापि, असा निर्धारित वापर ऑक्टोबर 2018 च्या प्रत्यक्ष मीटर वाचनाच्या आधारे समायोजित करण्यात आला, असे स्पष्टीकरण अदानी कंपनीच्या वतीने देण्यात आले.

श्री. कुलकर्णी म्हणाले की, अदानी कंपनीच्या स्पष्टीकरणावर आयोग समाधानी नसून प्राथमिक माहितीवरुन ऑक्टोबरच्या वीज देयकांमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अदानी कंपनीच्या स्पष्टीकरणाची अधिक तपासणी करण्याची गरज आहे. त्यासाठी माहिती आयुक्त अजित जैन आणि तांत्रिक विषयातील तज्ज्ञ विजय सोनवणे यांची दोन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

ही दोन सदस्यीय समिती अदानी कंपनीबरोबरच बेस्ट, टाटा पॉवर, महावितरण अशा अन्य वीज वितरण परवानाधारकांकडून मुंबई आणि मुंबई उपनगरातील या कालावधीत देण्यात आलेल्या देयकांचाही तुलनात्मक अभ्यास करेल. अदानी कंपनीच्या विद्युत देयकांमध्ये आकस्मिक झालेल्या दरवाढीची कारणे शोधून काढण्यासह भविष्यात असे प्रकार होऊ नयेत याबाबतच्या उपाययोजनांबाबतची शिफारसही ही समिती करेल.

आवश्यकता भासल्यास 2016-17 पासूनच्या रिलायन्स एनर्जी तसेच अदानी इलेक्ट्रीसिटी कंपनीच्या ताळेबंदाची तपासणी देखील ही समिती करु शकेल. या समितीने पुढील दोन ते तीन महिन्यांत आयोगाला आपला अहवाल देणे अपेक्षित आहे.

यापुढील वीज देयके योग्य दराने वितरीत व्हावीत यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून आयोगाने अदानी कंपनीला काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार आयोगाच्या सप्टेंबर 2018 च्या आदेशाप्रमाणे अदानी कंपनीने सरासरी 0.24 टक्के वाढीपेक्षा अधिक दराने आकारणी करु नये अशी मर्यादा घालून दिली आहे. सरासरी वीज वापरापेक्षा 15 टक्क्यांहून अधिक देयक आकारण्यात आलेल्या ग्राहकांच्या मीटर वाचनाची पडताळणी करावी.

तसेच जास्तीची वीज देयक आकारणी आढळून आल्यास अशी रक्कम नियमातील तरतुदीनुसार व्याजासह ग्राहकांना परत करावी किंवा पुढील विद्युत देयकात समायोजित करावी. शक्य तितकी अधिक विशेष शिबीरे आयोजित करुन वाढीव विद्युत देयकाबाबतच्या तक्रारींचे निराकरण करावे, असे निर्देश दिले असल्याचे श्री. कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.

संबंधित लेख