The activists who were active in attacks will not get job in Waluj MIDC | Sarkarnama

हल्लेखोरांना वाळूजच्या कारखान्यांत कधीही नोकऱ्या नाही -उद्योजकांचा निर्धार 

सरकारनामा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

कंपन्यांवर झालेला हल्ला हा अतिरेकी स्वरूपाचा असल्यामुळे सीसीटीव्ही फुटेज तपासून ज्या हल्लेखोरांची ओळख पटेल त्यांना संबंधित व इतर उद्योगात कायमची नोकरी बंदी करण्यात येणार असल्याचे उद्योजक संघटनेतर्फे जाहीर करण्यात आले. 

औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी देण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या दिवशी  वाळूज औद्योगिक वसाहतीतील कंपन्यावर  हल्ला झाला  होता. यात मोठ्या आणि छोट्या अशा एकून 75 हून अधिक कंपन्यांचे कोट्यावधींचे नुकसान झाले.

झाल्या प्रकाराबद्दल उद्योजकांनी तीव्र संताप व्यक्त करत या हल्याचा निषेध म्हणून आज (ता. 10) आपापले उद्योग बंद ठेवले. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील उद्योजकांच्या बैठकीत घेण्यात आली.

गुरुवारी रात्री उशिरा उद्योजकांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलना दरम्यान झालेल्या हल्याचा निषेध करत उद्योग हलवण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज पुन्हा उद्योजकांनी वाळूजमध्ये तातडीची बैठक घेतली. मराठवाडा ऑटो क्‍लस्टर येथे सकाळी 11 वाजता झालेल्या बैठकीत उद्योजकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

गुरुवारी झालेल्या तोडफोडीच्या प्रकरणावरून उद्योजकांनी पोलीसांच्या भूमिकेबद्दल देखील नाराजी व्यक्त केली. पोलीस असमर्थ ठरल्यामुळेच हल्लेखोरांनी बंद असलेल्या कंपन्यांमध्ये घूसुन तोडफोड केल्याचा आरोप उद्योजकांनी केला. हल्लोखारांना अटक करण्यासाठी कंपनीत लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज पोलीसांना देण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला. 

कंपन्यांवर झालेला हल्ला हा अतिरेकी स्वरूपाचा असल्यामुळे सीसीटीव्ही फुटेज तपासून ज्या हल्लेखोरांची ओळख पटेल त्यांना संबंधित व इतर उद्योगात कायमची नोकरी बंदी करण्यात येणार असल्याचे उद्योजक संघटनेतर्फे जाहीर करण्यात आले. 

एण्ड्युरन्स, मायलॉन, कॅनपॅक, सिमेन्स, नहार इंजि. यासह अनेक उद्योगांनी आज आपल्या कंपन्या बंद ठेवल्या. आंदोलकांनी केलेल्या कालच्या हल्यात बजाज, व्हेरॉक, इण्डुरन्स, स्टरलाईट, कॅनपॅक, गुडईअर, मायलान, स्टरलाईट, आकार टुल्स, मेटलमॅन, व्हेरॉक, एण्डुरन्स, सीमेन्स, गणेश प्रेसिंग, आकांक्षा पॅकेजिंग, नहार इंजिनिअरिंग सह इतर छोट्या कंपन्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

संबंधित लेख