action on ganpati mandap in nagar | Sarkarnama

शिवसेना उपनेते अनिल राठोडांच्या गणपती मंडळाचा मंडप जेसीबीने तोडला!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

प्रशासन धार्मिक भावनेचा विचार न करता कारवाई करीत आहे. गणपती मंडळाचे मंडप जेसीबीने तोडून प्रशासनाने काय साध्य केले. हीच पद्धत अवलंबवणार असतील, तर दंगली होतील. त्यास केवळ प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांनी दिला. 

नगर : प्रशासन धार्मिक भावनेचा विचार न करता कारवाई करीत आहे. गणपती मंडळाचे मंडप जेसीबीने तोडून प्रशासनाने काय साध्य केले. हीच पद्धत अवलंबवणार असतील, तर दंगली होतील. त्यास केवळ प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांनी दिला. 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये मंडळांनी मंडप उभारणीची तयारी सुरू केली. प्रशासनाने मात्र मंडपाचे उभारलेले स्ट्रक्‍चर जेसीबीच्या साह्याने उखडून टाकले. नगर शहरातील चितळेरोडवरील नेता सुभाष तरुण मंडळाच्या मंडपाची तयारी प्रशासनाने मोडून काढत नुकसान केले. हे मंडळ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. मंडप तोडल्याचे पाहून राठोड संतापले. त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत मंडप तोडल्याच्या ठिकाणीच उपोषण सुरू केले. 

या वेळी राठोड म्हणाले, नेता सुभाष तरुण मंडळ गेल्या चाळीस वर्षांपासून उत्सव साजरा करते. आज सकाळी अधिकाऱ्यांनी पोलिसांचा मोठा बंदोबस्त घेवून आले व मोडतोड केली. मंडपाचे सर्व स्ट्रक्‍चर जेसीबीने तोडले. परवानगी घेतली नाही, असे ते सांगत असले, तरी प्रशासनाने परवानगी देण्याचे काम लवकर का सुरू नाही केले. मंडळाचे कार्यकर्ते परवानगीसाठी गेले, मात्र परवानगी देण्याचे काम सुरूच झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा वेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काय करायचे. गणपती तोंडावर आले असताना परवाने कधी देणार.? शिवसेना हे खपवून घेणार नाही, असे राठोड म्हणाले. 

संबंधित लेख