"पाटणच्या वाघा'ची काळी "काच' उतरवली! 

काळ्या काचा असलेल्या गाड्यांचे फिल्मींग उतरविण्याची धडक कारवाई आज शहर वाहतूक शाखेने राबविली. शिवसेनेचे आमदार ज्यांना त्यांच्या समर्थकांकडून "पाटणचे वाघ' असे संबोधले जाते, त्या शंभूराज देसाई यांची गाडीही त्यातून सुटली नाही. त्यांच्या गाडीचीही "काळी काच' वाहतूक शाखेने काढली.
"पाटणच्या वाघा'ची काळी "काच' उतरवली!
"पाटणच्या वाघा'ची काळी "काच' उतरवली!

सातारा : काळ्या काचा असलेल्या गाड्यांचे फिल्मींग उतरविण्याची धडक कारवाई आज शहर वाहतूक शाखेने राबविली. शिवसेनेचे आमदार ज्यांना त्यांच्या समर्थकांकडून "पाटणचे वाघ' असे संबोधले जाते, त्या शंभूराज देसाई यांची गाडीही त्यातून सुटली नाही. त्यांच्या गाडीचीही "काळी काच' वाहतूक शाखेने काढली. 

वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर शहर वाहतूक शाखेने गेल्या काही दिवसांत कडक कारवाई सुरू केली आहे. रोज नवनवीन फंडे वापरत वाहनधारकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न वाहतूक शाखेकडून सुरू आहे. जून व जुलै महिन्यामध्ये, तर जोरदार मोहिमा राबवत कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये लायसन नसणे, ट्रीपल सीट वाहन चालविणे, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, हेल्मेट न वापरणे अशा विविध नियमांच्या उल्लंघनप्रकरणी कारवाया करण्यात आल्या. दोन महिन्यांमध्ये तब्बल सात हजार 863 वाहनांवर शहर वाहतूक शाखेने कारवाई केली. त्यामध्ये एकूण 21 लाख 19 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यामध्ये विशेषत: राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी चालविताना हेल्मेट न वापरणाऱ्या 988 वाहन चालकांवर कारवाई करून 4 लाख 95 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

वाहतूक शाखेचे ही धडक कारवाई याही महिन्यात सुरूच आहे. आज सकाळपासून वाहतूक शाखेने काळ्या काचा असलेल्या गाड्यांविरूद्ध मोहीम उघडली. काळ्या काचा असल्यामुळे गाडीतून कोण चालले आहे, हे निदर्शनास येत नाही. अशा पद्धतीच्या गाड्यांचा वापर दहशतवादी कारवायांत झाल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. तसा धोका निर्माण होऊ नये यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा राबविल्या जातात. शासनाने काळ्या काचांसदर्भात नियमही केलेले आहेत. त्याच नियमांच्या आधारे फिल्मींग उतरवून दंड करण्याची मोहिम आज सकाळपासून शहरात सुरू झाली. 

वाहतूक शाखेच्या या कारवाईतून कोणालाही सुटू दिले नाही. कोणत्याही वाड्याचा कार्यकर्ता असो किंवा रिपाईचा, दिसली काळ्या काचांची गाडी की वाहतूक शाखेने आज अडविलीच. केवळ दंडावर न थांबता काळी फिल्मीही वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी स्वत:हून उतरवली. सकाळपासून दुपारपर्यंत तब्बल 60 वाहनांवर अशा प्रकारे कारवाई झाली होती. तेवढ्यात पोवई नाक्‍यावर पाटणचे शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांची गाडी आली. गाडीवर आमदार, विधानसभा सदस्य असा मोठा स्टीकरही होता. तरीही (एमएच 11 एबी 7070) ही गाडी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अडविली. गाडी पोवईनाक्‍यावरील पोलिस केंद्राजवळ बाजूला घ्यायला सांगण्यात आली. गाडीमध्ये आमदार नव्हते. त्यानंतर पोलिसांनी त्या गाडीच्या काचांना असलेली काळी फिल्मींग स्वत:हून उतरविली. तसेच चालकाला दंडही ठोठावला. पोलिसांच्या या ठोस भूमिकेचे नागरिकांना कौतुक वाटत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com