abhishek kalamkar about parner vidhansabha | Sarkarnama

पारनेरकरांच्या शुभेच्छा आहेत, आता पक्षश्रेष्ठींनी संधी द्यावी : कळमकर

मुरलीधर कराळे
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

माझा पक्षश्रेष्ठींशी चांगला संपर्क आहे.

नगर:  महापालिकेत उमेदवारी न करण्याच्या निर्णयावर मी ठाम आहे. महापौरपद असताना ४० कोटींची कामे करू शकलो, याचा अभिमान आहे. शहरातील जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी कसून प्रयत्न करू, असे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी सांगितले. 

पारनेरमधून विधानसभेची उमेदवारी करणार का, असा थेट प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले, पक्षश्रेष्ठी उमेदवार देतील, त्याला निवडून आणू. मला संधी दिल्यास संधीचे सोने करू, असे सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे पारनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याचे सुतोवाच केले.

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून परिचित असलेले माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे अभिषेक हे पूत्र आहेत. पारनेरमध्ये त्यांचा मोठा संपर्क आहे. त्या पार्श्वभूमीवर अभिषेक कळमकर यांना पारनेरमधून उमेदवारी मिळण्यासाठी कळमकर प्रयत्नशील असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर अभिषेक निवडून येण्याची शक्यता असताना त्यांनी अचानक आपण महापालिकेची उमेदवारी करणार नसल्याचे जाहीर केले.

याबाबत कळमकर म्हणाले, पक्षाने आजवर मोठी पदे दिली. पक्षाचा चांगला उपयोग लोकांच्या हितासाठी कसा करावा, यासाठी यापूर्वी प्रयत्न केले. नवीन इच्छुक अनेक उमेदवार आहेत. त्यांनाही संधी मिळाली पाहिजे.

विधानसभेला पारनेरकरांच्या शुभेच्छा असल्या, तरी लोकांच्या सहवासात राहणे व त्यांची कामे करीत राहणे, यातच मला समाधान वाटते. युवकांच्या अपेक्षा ओळखून काम करणार आहे. माझा पक्षश्रेष्ठींशी चांगला संपर्क आहे. आगामी काळात मोठ्या निवडणुकांसाठी संधी मिळाल्यास त्याचे सोने करू. वडीलांनी घालून दिलेल्या आदर्शला तडा जाऊ देणार नाही, असे ते म्हणाले. 

संबंधित लेख