Abdul Sattar not ready to part with loksabha seat | Sarkarnama

दोन वर्ष मतदारसंघात जीवापाड मेहनत घेतली, राष्ट्रवादीला जागा कशी सोडणार?-अब्दुल सत्तार 

जगदीश पानसरे 
मंगळवार, 15 जानेवारी 2019

पक्षाचे कार्याध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे, विद्यमान आमदार सुभाष झांबड, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, प्राध्यापक रविंद्र बनसोड, काही महिन्यांनी शासकीय सेवेतून निवृत्त होणारे एक बडे सनदी अधिकारी देखील कॉंग्रेसकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक.

औरंगाबादः "मराठवाड्याची राजधानी असलेले औरंगाबाद शहर आणि जिल्हा राजकीयदृष्ट्या अतंयत महत्वाचा आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या मराठवाड्यातील राजकारणाचे हे शहर प्रवेशद्वार म्हटले तर वावगे ठरणार नाही. परंतु आगामी लोकसभा निवडणुक कुठल्याही परिस्थीतीत जिंकायचीच या निर्धाराने मी कॉंग्रेसचा जिल्हाध्यक्ष या नात्याने कार्यकर्त्यांसोबत जीवापाड मेहनत घेतोय. "

"राज्यात व देशात भाजप-शिवसेनेच्या विरोधात वातावरण आणि आमच्या जिंकण्याची खात्री असतांना हा मतदारसंघ राष्ट्रवादीला कसा सोडणार?" असा रोखठोक सवाल जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी सरकारनामाशी बोलतांना केला. 

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून कॉंग्रेसचा उमेदवार सलग पराभूत होत आहे. या पार्श्‍वभूमीवर 2019 मध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडा अशी मागणी केली जात आहे. राष्ट्रवादीच्या राज्यातील इतर कुठल्याही मतदारसंघाच्या बदल्यात औरंगाबादची जागा पदरात पाडून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्नशील आहेत. आज दिल्लीत या संदर्भात महत्वाची बैठक वरिष्ठ नेत्यांमध्ये होणार असल्याचे समजते. 

या संदर्भात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार म्हणाले," उद्या (ता.17) औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेस इच्छूकांची एक यादी आम्ही कॉंग्रेसच्या संसदीय समितीला पाठवणार आहोत. त्यावर 26 तारखेला आमच्या पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी अंतिम निर्णय घेतील. राहिला प्रश्‍न राष्ट्रवादीने या जागेवर दावा सांगण्याचा तर त्यात काही गैर नाही."

"परंतु आजचा विचार केला तर औरंगाबाद जिल्ह्यातील दोन्ही पक्षाच्या ताकदीचा विचार केला तर कॉंग्रेस राष्ट्रवादीपेक्षा किती तरी पुढे आहे. वैजापूर वगळता राष्ट्रवादीचा जिल्ह्यात आमदार नाही, महापालिका आणि नगरपालिका मिळून त्यांचे 8-9 नगरसेवक आहेत. त्या तुलनेत कॉंग्रेसची जिल्हा परिषदेसह अनेक नगरपालिकांमध्ये सत्ता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून जागा सोडवण्यासाठी कितीही प्रयत्न सुरू असले तरी औरंगाबाद मतदारसंघ कॉंग्रेसकडेच राहावा यासाठी आम्ही आग्रही राहणार आहे," असे सत्तार यांनी सांगितले . 

आमच्याकडे उमेदवारांच्या रांगा.. 

"लोकसभा लढवण्यास इच्छूक असलेल्यांची आमच्याकडे कमतरता नाही. उमेदवारीसाठी अक्षरशा रांगा लागल्या आहेत. त्यामुळे ताकदीचा उमेदवार मैदानात उतरवून कॉंग्रेस ही जागा जिंकू शकते. जनसंघर्ष, एल्गार यात्रेच्या माध्यमातून आम्ही गावागावात आताच्या सरकारमध्ये असलेला संताप पाहिला आहे. त्याचे परिवर्तन मतांमध्ये करू शकलो तर कॉंग्रेस औरंगाबाद लोकसभेत इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही", असे त्यांनी सांगितले . 

श्री. सत्तार पुढे म्हणाले,"कॉंग्रेसच्या स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना याची जाणीव झाल्यामुळे आजघडीला आमच्याकडे लोकसभा लढवण्यास अनेकजण इच्छूक आहेत. पक्षाचे कार्याध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे, विद्यमान आमदार सुभाष झांबड, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, प्राध्यापक रविंद्र बनसोड, काही महिन्यांनी शासकीय सेवेतून निवृत्त होणारे एक बडे सनदी अधिकारी देखील कॉंग्रेसकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचेहीआहेत ."

संबंधित लेख