Abdul Sattar to Help Harshwardhan Jadhav in LS Election | Sarkarnama

अब्दुल सत्तारांचे वजन हर्षवर्धन जाधव यांच्या पारड्यात

माधव इतबारे
सोमवार, 15 एप्रिल 2019

कॉंग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना सोमवारी (ता. 15) आपला पाठिंबा जाहीर केला. कॉंग्रेसने आपल्यावर अन्याय केला असून, जाधव यांना निवडून आणत अन्यायाचा बदला घेऊ, असा इशारा सत्तार यांनी पत्रकार परिषदेत दिला. माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते.

औरंगाबाद - कॉंग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना सोमवारी (ता. 15) आपला पाठिंबा जाहीर केला. कॉंग्रेसने आपल्यावर अन्याय केला असून, जाधव यांना निवडून आणत अन्यायाचा बदला घेऊ, असा इशारा सत्तार यांनी पत्रकार परिषदेत दिला. माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते.

लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर सत्तार यांनी बंड करत अपक्ष निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला होता. समर्थकांचा मेळावा घेऊन त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सत्तारांनी माघार घेत 15 एप्रिलला कोणाला पाठींबा देणार हे जाहीर करू, अशी घोषणा केली होती.  त्यानुसार सोमवारी पत्रकार परिषद घेऊन हर्षवर्धन जाधव यांना आपला पाठींबा जाहीर केला. मी अपक्ष लढणार होतो, मात्र माघार घेतली, त्यामुळे एका अपक्षालाच पाठींबा दिला. जाधव यांचे ट्रॅक्‍टर दिल्लीत पाठवून कॉंग्रेसने आपल्यावर केलेल्या अन्यायाचा बदला घेणार असे सत्तार म्हणाले.

जालन्याचा निर्णय बैठकीनंतर
जालन्यात कोणाला पाठींबा देणार याचे उत्तर सोमवारी रात्री बैठक झाल्यानंतर देऊ असे सत्तार म्हणाले. जाधव यांचे सासरे रावसाहेब दानवे यांना पाडण्याची भूमिका एकीकडे तुम्ही घेता, दुसरीकडे जावयाला पाठींबा देता? या प्रश्‍नावर जाधव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या दानवे यांचा कधीच फायदा घेतला नाही, असा दावा सत्तार यांनी केला. जोपर्यंत दानवे पडणार नाहीत तोपर्यंत डोक्‍यावर केस वाढवणार नाही, या प्रतिज्ञेचा त्यांनी पुरूच्चार केला.

संबंधित लेख