आबा बागूलांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाणांना केले `हायजॅक`! दुसरीकडे बागवेंचा पुकारा

आबा बागूलांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाणांना केले `हायजॅक`! दुसरीकडे बागवेंचा पुकारा

पुणे : कॉंग्रेसमधील मातब्बर नेते कधी काय करतील, याचा खरोखरीच नेम नाही. भल्याभल्यांना या मंडळींच्या डावपेचांचा अंदाजही येत नाही. आपल्याच पक्षातील प्रतिस्पर्ध्यांना शह म्हणून कॉंग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांनी आज जनसंघर्ष यात्रेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाच "हायजॅक' केले.

आबांच्या कुरघोडीचा अंदाज असलेल्या कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे ध्वनिक्षेपकावरून "आबा, साहेबांना (चव्हाण) सोडा, त्यांना खूप फिरायचे आहे,' असे चार-पाच वेळा जाहीर करावे लागले. तरीही आबांनी साहेबांना सोडले नाही, तेव्हा आबांचे चिरंजीव अमित बागुल यांनी चव्हाण आणि आबांना आणले.

 
या चर्चेत आबा काहीच राजकीय खलबते करणार नाहीत, यावर त्यांच्या पक्षातर्गंत विरोधकांना विश्वास नसावाच. मिळालेल्या माहितीनुसार "पर्वती विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून आपणच कसे उजवे आहोत, हे आबांनी चव्हाणांच्या गळी उतरविले. यात्रा पर्वतीतून पुढे सरकताच आबांनी चव्हाणांसोबतच्या चर्चेचा तपशील जाहीर केला. येथील स्पर्धकांच्या आधीच आपली बाजू मांडून बागूल मोकळे झाले.

 
कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला कात्रजमधून सुरवात झाली. ती दुपारी साडेबाराच्या सुमारे पर्वती मतदारसंघात आली. येथील इच्छुक आबा, अभय छाजेड यांनी शक्तीप्रदर्शन केले. ही यात्रा आपला पारंपरिक मतदार असलेल्या भागातून नेण्याची व्यवस्था आबांनी केली होती. तेव्हा चव्हाणांचे स्वागत, औक्षण होईल याचीही काळजी त्यांनी घेतली होती.

यात्रेतील वाहनांचा ताफा राजीव गांधी ई-लर्निग स्कूल आला तेव्हा गर्दीने कॉंग्रेस नेत्यांचे जंगी स्वागत केले. चव्हाणांसह हर्षवर्धन पाटील, बागवे, शरद रणपिसे, मोहन जोशी, उल्हास पवार एका वाहनात होते. तेव्हा आबांनी चव्हाण यांना राजीव गांधी विद्यालयात नेले. एक-दोन मिनिटे म्हणत आबांनी चव्हाणांशी जवळपास 15 ते 20 मिनिटे चर्चा केली.

चव्हाण यांना घेऊन आबा लवकर येत नसल्याचे बागवेंच्या लक्षात आले. त्यामुळे "साहेबांना लवकर सोडा, त्यांना पुढे फिरायचे' असे बागवेंना जाहीर आवाहन करावे लागले. त्यानंतर दहा मिनिटांनी अमित यांनी आबा आणि चव्हाणांना आणले. त्यानंतर चव्हाणांनी थोडक्‍यात आपले भाषण आटोपले. केंद्र आणि राज्य सरकार त्यांनी जोरदार टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com