aatmaklesh yatra | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

ठसठसणाऱ्या पायांसह ते गाठणार राजभवन! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 27 मे 2017

राज्यात मोठ्या प्रमाणात उकाडा असताना उन्हात दोन-चार किलोमीटर चालणे अवघड आहे. या परिस्थितीत यात्रेतील कार्यकर्ते रोज 25-30 किलोमीटरचे अंतर चालत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हे आव्हान ते पेलत आहेत. मात्र सरकार त्यांची अजून किती दिवस परीक्षा पाहणार, हा प्रश्‍न आहे. 

पुणे : येथील महात्मा फुले वाड्यापासून सुरु झालेल्या आत्मक्‍लेश यात्रेने मुंबईच्यादिशेने सुमारे सव्वाशे किलोमीटर अंतर कापले आहे. 35 ते 40 अंश सेल्सीअस तापमानात रणरणत्या उन्हात आणि तापलेल्या डांबरी रस्त्यावर चालणारे कार्यकर्ते अक्षरश: जेरीस आले आहेत. यात्रेचे नेतृत्व करणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांच्या पायाला फोड आले आहेत. यात्रेतील शेकडो लोक पायाला आलेल्या फोडांमुळे आणि होत असलेल्या वेदनांमुळे हैराण आहेत. मात्र हार न मानता सर्वांनी राजभवनाच्यादिशेने आगेकूच सुरू ठेवली आहे. 

पुण्यात 22 मे रोजी या यात्रेला सुरवात झाली. 30 मे रोजी मुंबईत राजभवनावर यात्रेचा समारोप होणार आहे. यादरम्यान ठिकठिकाणी मुक्‍काम करत यात्रा पुढे निघाली आहे. स्थानिकांनी नाष्टा, काही ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या काही गावांतून रोज भाकरी, तसेच इतर साहित्य यात्रेत येत आहे. 500, 1 हजार, 5 हजार आपापल्या कुवतीप्रमाणे लोक मदत करत आहेत. अतिशय शिस्तीने यात्रा सुरु आहे. 

स्वाभिमानीचे अध्यक्ष खासदार शेट्टी हे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आक्रमक झाले असताना राजकीय विरोधकांनी त्यांना चक्रव्यूहात अडकविण्याची रणनिती आखली आहे. संघटनेत फूट पाडण्याच्या प्रयत्न त्यांच्याच मित्रपक्षांकडून सुरु आहे. दुसऱ्या बाजूला कॉंग्रेस- राष्ट्रवादीही त्यांच्यावर तुटून पडली आहे. छोट्या-मोठ्या शेतकरी संघटनाही शेट्टींना जमेला तसा विरोध करत आहेत. या परिस्थितीत तीव्र उन्हाने आणखी अडचणी वाढविल्या आहेत. 

पुणे-मुंबई पट्ट्यात साधारणत: 35 ते 40 अंश सेल्सिअस तापमान आहे. सकाळी 10 वाजता उन्हाचा तडाखा सुरु होतो. हे ऊन सहन करत कार्यकर्ते पुढे निघाले आहेत. सद्या ही यात्रा रायगड जिल्ह्यात असून त्यांनी सुमारे सव्वासे किलोमीटरचे अंतर कापले आहे. एवढ्या पायपीटीमुळे बहुतेकांचे पाय सोलवटून निघाले आहेत. मोठ-मोठे फोडे आले आहेत. वेदनांनी पाय ठसठसत आहेत. यात्रेतील वयस्कर लोकांना तर फार त्रास होत आहे. स्वत: राजू शेट्टी हे वेदनांनी बेजार झाले आहेत. त्यांच्या पायाला फोड आले आहेत. डॉक्‍टरांनी त्यांची तपासणी केली असून विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र शेट्टी जमेल तशी विश्रांती घेत कार्यकर्त्यांबरोबर पुढे निघाले आहेत. 

 

 

फोटो फीचर

संबंधित लेख