Aasud Yatra begins | Sarkarnama

देवेंद्र ते नरेंद्र आसूड यात्रेला सुरवात 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 एप्रिल 2017

नागपूर : "रक्त घ्या; पण जीव घेऊ नका' अशा घोषणा देत आमदार बच्चू कडू व शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र ते नरेंद्र आसूड यात्रेला आज नागपुरातून सुरवात झाली. 

नागपूर : "रक्त घ्या; पण जीव घेऊ नका' अशा घोषणा देत आमदार बच्चू कडू व शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र ते नरेंद्र आसूड यात्रेला आज नागपुरातून सुरवात झाली. 

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त साधून आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज आसूड यात्रा निघाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गावातून निघालेली ही यात्रा येत्या 21 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शहर वडनगर येथे पोहोचणार आहे. ज्या ठिकाणी मोदींनी चहा विकला त्याच ठिकाणी जाऊन एक हजार शेतकरी रक्तदान करणार आहेत. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, शेतमालांना योग्य भाव द्या, या मागण्यांसाठी हे रक्तदान केले जाणार आहे. "रक्त घ्या; परंतु जीव घेऊ नका' अशी मागणी केली जाणार आहे. 

नागपुरातील संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही यात्रा सेलू, वर्धा, देवळी, यवतमाळ मार्गे राज्यातील 24 जिल्ह्यांतून जाणार आहे. ही यात्रा धुळे, नंदुरबारमार्गे गुजरातमध्ये जाणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी येथे "चाय पे चर्चा' करताना शेतकऱ्यांना अनेक आश्‍वासने दिली होती. शेतमालांना दुप्पट भाव देण्यात येईल. कर्जमाफी करण्यात येईल, अशी आश्‍वासने दिली होती. या आश्‍वासनांची आता त्यांनी पूर्तता करावी, अशी मागणी आमदार कडू यांनी केली. यावेळी शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यातून शेतकरी आले होते. पंजाबमधून शेतकरी नेते गुरनामसिंग आले आहेत. 

संबंधित लेख