aashish deshmukh and bjp | Sarkarnama

पक्षातून बाहेर पडल्यावर आशीष देशमुखांना फुटला कंठ ...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारला धोरण लकव्याने ग्रासले असून सर्व क्षेत्रात राज्य पिछाडीवर जात असल्याचे माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. 

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारला धोरण लकव्याने ग्रासले असून सर्व क्षेत्रात राज्य पिछाडीवर जात असल्याचे माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. 

डॉ. आशीष देशमुख यांनी गेल्या 2 ऑक्‍टोबरला दिलेला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर भाजपच्या सदस्यत्वापासून फारकत घेतली आहे. या संदर्भात त्यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना 11 ऑक्‍टोबरला पत्र पाठविले. या पत्राची प्रत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाही पाठविली आहे. चार पानांच्या या पत्रात आपण राजीनामा कां देत आहोत,याचा सविस्तर खुलासा डॉ. देशमुख यांनी केला आहे. 

त्यांनी पत्रात म्हटले आहे की सत्तेत येण्यापूर्वी नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होत नसल्याचे डॉ. देशमुख यांनी या पत्रात निदर्शनास आणून दिले. स्वतंत्र विदर्भ व शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर या दोन्ही नेत्यांनी दिलेल्या आश्‍वासनांवर कायम राहिले नाहीत. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजना व इतर प्रश्‍नांवरही सरकारने समाधानकारक निर्णय न घेतल्याने लोकांमध्ये तीव्र असंतोष आहे. या संदर्भात या दोन्ही नेत्यांशी संपर्क साधल्यानंतरही कोणतेही उत्तर मिळाले नाही. राज्यात सध्या टंचाईसदृश परिस्थिती असताना राज्य सरकार केवळ ढिम्मपणे या स्थितीकडे पाहत आहे. जनतेच्या प्रश्‍नांना जर पक्षामध्ये व सरकारमध्ये किंमत मिळत नसेल तर जनप्रतिनिधी म्हणून राहण्यात कोणतेही मला स्वारस्य नाही. 

माझी बांधिलकी पक्षापेक्षा जनतेशी आहे. धोरण लकव्याने ग्रासलेल्या भाजपला पुढील निवडणुकीत विदर्भात मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल, असे भाकीतही डॉ. देशमुख यांनी पत्रात वर्तविले आहे. या धोरण लकव्यामुळे आपण विधानसभा सदस्यत्वाची राजीनामा दिला असून भाजपच्या सदस्यत्वाची राजीनामा देत असल्याचे पत्रात नमूद केले आहे. 

संबंधित लेख