aandandrao devkate | Sarkarnama

माजी मंत्री आनंदराव देवकतेंवर भाजपचे जाळे! 

राजाराम ल. कानतोडे 
गुरुवार, 6 जुलै 2017

या भेटीबाबत बाळासाहेब शेळके म्हणाले, ""राजकीय चर्चा इथे झाली नाही. शिंदे यांच्याशी राजकारणापलीकडचे घनिष्ठ संबंध आहेत. श्री. देवकते यांची प्रकृती बरी नव्हती. त्याशिवाय मंत्री झाल्यावर शिंदे यांनी देवकते यांची भेट घेतली नव्हती. त्यामुळे ते भेटायला आले होते. चौंडीत अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहे, असे आश्‍वासन शिंदे यांनी दिले.'' 

सोलापूर : कॉंग्रेसचे नेते, माजी मंत्री आनंदराव देवकते सध्या राजकीय विजनवासात आहेत. मुख्यमंत्र्यांशी जवळीक असलेले भाजपचे जलसंधारण आणि ओबीसी खात्याचे मंत्री राम शिंदे यांनी नुकतीच त्यांची भेट घेतली. नुसतीच भेट घेतली नाही तर श्री. देवकते यांचे त्यांनी आदर्शवत नेते म्हणून कौतुक केले. या भेटीत अनेक अर्थ दडले असून, यानिमित्ताने भाजपने देवकतेंवर जाळे टाकले आहे. 

सोलापूर दौऱ्यावर असताना भाजपचे मंत्री राम शिंदे यांनी नुकतीच दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील राजूर येथे कॉंग्रेसचे नेते आनंदराव देवकते यांची भेट घेतली. श्री. देवकते सध्या राजकीय विजनवासात आहे. त्यांच्याकडे तसे कुठलेही पद नाही. पण दक्षिण सोलापूर तालुक्‍यात एकेकाळी देवकते यांची एकहाती सत्ता होती. ते 1978, 85, 90, 95, 99 ला विधानसभेसाठी ते पाच वेळा निवडून आले. त्यानंतर विलासराव देशमुख यांच्या मत्रिमंडळात 1999 मध्ये कॅबिनेट मंत्री झाले. पुढे सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले. त्यांच्यासाठी मंत्रिपदाबरोबरच आमदारकीचा देवकते यांनी राजीनामा दिला होता. मुख्यमंत्र्यांसाठी स्वतःचे मंत्रिपद आणि आमदारकीचा त्याग करणारा माणूस म्हणून त्यांची नोंद झाली आहे. त्या वेळी 2003 मध्ये पोटनिवडणुकीत शिंदे विजयी झाले. त्यानंतर पुन्हा 2004 मध्ये विधानसभा निवडणूक लागल्यावर शिंदेच तिथून आमदार आले. लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिंदे यांच्या जागी देवकते यांना संधी देण्यात आली. त्यात 20 हजार मतांनी (कै.) प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी त्यांचा पराभव केला. 

पुन्हा सुशीलकुमार शिंदे आंध्रप्रदेशचे राज्यपाल झाल्यानंतर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी देवकते इच्छुक होते, पण त्यांना संधी मिळाली नाही. कॉंग्रेसचा उमेदवार पडला. ते पुढे कॉंग्रेसचे काही काळ जिल्हाध्यक्ष होते, पण आमदारकी गेली तसा देवकते यांचा राजकीय विजनवास सुरू झाला, असे म्हटले तर वावगे ठरू नये. ते पुढे विधानसभेसाठी उभे राहिले नाहीत. साहाजिक ते राजकीय प्रवाहातून बाहेर फेकले. पंचायत समितीत त्यांची पुढे काही काळ सत्ता होती, मात्र नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांचे पुत्र अशोक देवकते यांनाही पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे साहाजिकच राजकीय सत्तास्थानांपासून दूर असलेल्या देवकते यांची भाजपचे मंत्री राम शिंदे यांनी घेतलेली भेट हा चर्चेचा विषय झाला आहे. 

श्री. देवकते राजकीय विजनवासात असले तरी त्यांना मानणारा एक गट दक्षिण सोलापूर तालुक्‍यात आहे. या गटाचे प्रमुख म्हणून बाळासाहेब शेळके यांचे नाव घेतले जाते. देवकते यांच्यानंतर तेही कॉंग्रेसचे काही काळ जिल्हाध्यक्ष होते, पण त्यांनी गेली विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लढविली. त्यात ते हरले. त्यांची कॉंग्रेसमधून हकालपट्टी झाली. देवकते पुन्हा कॉंग्रेसमध्ये गेले. मागच्या दोन महिन्यांपूर्वीही राम शिंदे यांच्यासाठी शेळके यांनी खास स्वतःच्या घरी भोजनाचा बेत केलेला होता. त्यांचे संबंध कौटुंबिक आहेत. पण तरीही भाजप सध्या बेरजेचे राजकारण करीत आहे. धनगर समाजाला सध्या मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीच्या आंदोलनात आरक्षण देऊ असा शब्द दिला होता. तो अजून पाळलेला नाही. आता ज्यांची ताकद आहे, अशा धनगर समाजातील नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना पदे देऊन समाजाचा रोष कमी करता येईल का, असा पक्षाचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. त्याचसाठी राम शिंदे चाचपणी करीत असावेत, असा अंदाज राजकीय वर्तुळात आहे. 

 

संबंधित लेख