aadinath suger | Sarkarnama

'आदिनाथ'च्या लालसर साखरेमुळे करमाळ्यात तणाव ! 

अण्णा काळे 
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

"साखर ओली तर आहेच शिवाय ती पिवळसर, लालसर असून काळपट पडली आहे. साखरेत कचराही आहे. सभासदांनी बाळेवाडी येथे "साखर खराब कशी' असे विचारलाला सुरू केले तेव्हा कारखाना कामगाराने साखर वाटप बंद केले.' 
- शहाजी शिंगटे, पाडळी 

"आदिनाथ कारखान्याच्या साखर वाटपाविषयी अन्न व औषध प्रशासनाकडून लवकरच नमुने घेतले जातील. ते तपासून कोणी दोषी आढळून आले तर पुढील कारवाई केली जाईल.' 
-एस.बी.नागरगुड्डे, सहाय्यक आयुक्त (अन्न व औषध प्रशासन) 

करमाळा (सोलापूर) : शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी आदिनाथ कारखान्याच्यावतीने वाटप करण्यात येत असलेली साखर जुनी आणि लालसर असल्याचे समोर आले आहे. ही साखर आरोग्यास अपायकारक ठरण्याची शक्‍यता असल्यामुळे काही वाटप केंद्रावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, कारखान्याच्या संचालिका रश्‍मी बागल यांनी साखर चांगली असल्याचे म्हटले आहे. 

आठ दिवसांपासून हे साखर वाटप सुरू आहे. 28 रूपये किलो दराने 25 किलो साखरेचे वाटप सध्या तालुकाभर सुरू आहे. यातील काही ठिकाणी वितरित केलेली साखर लालसर, काळपट व मुंग्या असलेली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर बालेवाडी (ता. करमाळा) येथील साखर वाटप केंद्रावर गुरुवारी काही सभासदांनी साखर नाकारली. काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर येथील साखर वाटप केंद्र बंद करण्याची नामुष्की कारखान्यावर आली. वरकटणे येथेही यावर वाद झाला. अशीच साखर इतर भागात वितरीत झाली आहे. 

वितरित होत असलेल्या साखर पोत्यांवर सन 2005-2006 हे साल छापलेले आढळून आले. सध्या सोशल मिडीयातून या पोत्याचे व लालसर साखरेचे फोटो फिरत असल्याने सभासदमध्ये संभ्रमवस्था निर्माण झाली आहे. दरम्यान, जुनी साखर वाटप करणे बेकायदेशीर असल्याचे अन्न व औषध प्रशासन अधिकारी बी. एस. लोंढे यांनी म्हटले आहे. 

यासंदर्भात "आदिनाथ'च्या संचालिका रश्‍मी बागल यांनी म्हटले आहे की, वाटण्यात येत असलेली साखर चांगली आहे. सन 2005 -2006 असा शिक्का असलेल्या पोत्यात चुकून कामगारांकडून साखर भरली गेली. ऐवढी जुनी साखर शिल्लक कशी असु शकते? संबंधित दोन कामगारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गेल्यावर्षी तर कारखाना बंद होता. सन 2015-16 मधील ही साखर आहे. साखर उत्पादित केल्यानंतर ती तीन वर्षे चांगली रहाते. जास्त दिवस साखर गोडावूनमध्ये राहिल्याने तिचा रंग थोडा पिवळसर झाला आहे. आदिनाथ कारखाना चालू नये, अशी विरोधकांची भावना आहे. त्यामुळे विनाकारण साखर वाटपाचे राजकारणात केले जात आहे. सभासदांनी अफवांना बळी पडू नये, असे बागल यांनी म्हटले आहे. 

 

 

संबंधित लेख