40 PMC corporators present for MP Kakde`s function | Sarkarnama

खासदार संजय काकडे यांच्या कार्यक्रमाला  दोन आमदार अन्‌ 40 नगरसेवक उपस्थित! 

मंगेश कोळपकर
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

पुणे महापालिकेत भाजपचे दोन गट आहेत. मात्र कोणत्या गटाची किती ताकद आहे, याबाबत विविध दावे-प्रतिदावे करण्यात येत होते. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी आयोजित केलेल्या स्वच्छता कार्य़क्रमाला भाजपचे १०३ पैकी ४० नगरसेवक आज उपस्थित राहिले. आता पुण्यातील पुढील राजकारणात हा आकडा चर्चेचा विषय ठरणार आहे. 

पुणे : भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी "स्वच्छ भारत, सुंदर भारत'चा नारा देत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला महापौर मुक्ता टिळक यांच्यासह दोन आमदार, 40 नगरसेवक यांनी आज उपस्थिती लावली. सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले हे या प्रसंगी हजर होते. 

पुणे महापालिकेत भाजपमध्ये पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार काकडे असे दोन गट असल्याचे दिसून येत होते. कोणत्या गटाची किती ताकद आहे, याबाबत दावे-प्रतिदावेही करण्यात येत होते. त्यामुळे काकडे यांच्या कार्यक्रमाला एकूण 40 नगरसेवकांची किंवा नगरसेविकांच्या पतींची उपस्थिती, हा चर्चेचा विषय झाला. 

पुणे रेल्वे स्टेशन ते मालधक्का तसेच ससून रुग्णालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान खासदार काकडे यांनी आयोजित केले होते. त्यासाठी नगरसेवक आणि आमदार, पदाधिकाऱ्यांना निरोपही दिले होते. अनेक नगरसेवकांनी येताना कार्यकर्ते आणले होते. त्यामुळे स्वच्छता अभियानाला मोठी गर्दी झाली होती. अभियानाची नियोजीत वेळ सकाळी नऊची असली तरी, आठ वाजल्यापासूनच कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी झाली होती. स्वच्छतेसाठी तयारीही जय्यत झाली होती. 

महापौर टिळक, खासदार शिरोळे यांनीही या उक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, भाजपचे पर्वती विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष हरिष परदेशी आदी या प्रसंगी उपस्थित होते. आमदार कुलकर्णी आणि काकडे यांचे मधल्या काळात वाद झाले होते. मात्र, पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळे त्या उपस्थित होत्या, असे सूत्रांनी नमूद केले. तर, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ अन्य कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे अनुपस्थित होते. 

या अभियानाला नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, सुनील कांबळे, प्रकाश ढोरे, शंकर पवार, बापुराव कर्णे गुरुजी, राहुल भंडारे, धीरज घाटे, मनीषा लडकत, मंगला मंत्री, कालिंदा पुंडे, राजाभाऊ लायगुडे, अमोल बालवडकर, किरण दगडे पाटील, विजय शेवाळे, दिलीप वेडेपाटील, प्रसन्न जगताप, प्रा. जोत्स्ना एकबोटे, सरस्वती शेंडगे, हरिभाऊ चरवड, राजश्री काळे, नीता दांगट, राजश्री नवले, ज्योती कळमकर, उमेश गायकवाड, सुशील मेंगडे, तसेच दिनेश धाडवे, विष्णू हरिहर, तुषार पाटील, परशुराम वाडेकर, अशोक लोखंडे, भरत वैरागे, चंद्रकांत चौधरी, रायबा भोसले, संतोष आरडे, अजय सावंत, धनराज घोगरे उपस्थित होते. 
 
 

संबंधित लेख