40 Municipal commissioners in 20 years at Ulhasnagar | Sarkarnama

उल्हासनगरात 22 वर्षात 40 आयुक्त, नवे आयुक्त हांगे होणार 8 महिन्यात निवृत्त !

दिनेश गोगी
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

मागील दोन वर्षात उल्हासनगरकरांनी आलटून पालटून असे 10 आयुक्त बघितले आहेत. त्यात राजेंद्र निंबाळकर, डॉ.सुधाकर शिंदे यांच्या अदला-बदलीचा प्रकार विशेष गाजला.

उल्हासनगर  : महानगरपालिकेची स्थापना 1996 साली झाल्यापासूच्या 22 वर्षात तब्बल 40 आयुक्तांनी उल्हासनगरचा पदभार हाताळला आहे.विशेष म्हणजे मागील 2 वर्षात 10 आयुक्तांच्या बदल्या झाल्या  आहेत .   त्यात आजपासून विराजमान झालेले आयुक्त अच्युत हांगे हे 8 महिन्यात सेवानिवृत्त होत असल्याने त्यानंतर पुन्हा नव्या आयुक्तांच्या प्रतिक्षा असे चित्र दिसणार आहे.

1996 साली महानगरपालिकाची स्थापना झाल्यावर 22 ऑक्टोबर ते 20 डिसेंबर हे दोन महिने प्रशासक म्हणून पृथ्वीराज बायस यांनी काम पाहिले. त्यानंतर रामनाथ सोनवणे, एस.एच.शुळ, व्ही.एस.जोगळेकर, अ.द.काळे, टी.चंद्रशेखर, रा.द.शिंदे, के.पी.बक्षी, बी.आर.पोखरकर, डी.एस.पाटील, सदाशिव कांबळे, समीर उन्हाळे, अशोक बागेश्वर, अशोककुमार रनखांब,विजयकुमार म्हसाळ,बालाजी खतगावकर, मनोहर हिरे, ई.रवींद्रन, राजेंद्र निंबाळकर, डॉ.सुधाकर शिंदे, गणेश पाटील,गोविंद बोडके,यांनी पदभार हाताळला आहे . 

 आजपासून अच्युत हांगे उल्हासनगरात हजर झालेले आहेत.यात व्ही.एस.जोगळेकर यांनी पाचदा, रा.द.शिंदे यांनी चारदा, रामनाथ सोनवणे, एस.एच.शुळ, अ.द.काळे यांनी प्रत्येकी तिनदा, सदाशिव कांबळे, मनोहर हिरे, राजेंद्र निंबाळकर,गणेश पाटील यांनी प्रत्येकी दोनदा आयुक्तपदाची जबाबदारी हाताळली आहे.यात सर्वाधिक तीन वर्षांच्या वर कालावधी हाताळण्याचा विक्रम रामनाथ सोनवणे,बालाजी खतगावकर यांच्या नावावर आहे.

2 वर्षात 10 आयुक्त,त्यात अदला-बदली गाजली

मागील दोन वर्षात उल्हासनगरकरांनी आलटून पालटून असे 10 आयुक्त बघितले आहेत. त्यात राजेंद्र निंबाळकर,डॉ.सुधाकर शिंदे यांच्या अदला-बदलीचा प्रकार विशेष गाजला. 22 सप्टेंबर 2016 ते 16 मार्च 2017 अशा केवळ सहा महिन्यात आक्रमक असा ठसा उल्हासनगरात उमटवणारे राजेंद्र निंबाळकर यांची बदली पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी झाल्यावर त्यांच्या जागेवर पनवेलचे आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांची नियुक्ती झाली.

कोणताही धोरणात्मक निर्णय घेणार नाही असा निर्णय प्रथम जाहीर करणारे डॉ.शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या. पुन्हा त्यांची बदली पनवेलला व निंबाळकर यांची बदली उल्हासनगरात झाली.  मात्र डॉ.शिंदे यांनी फक्त एका दिवसाचा तोंडी पदभार अतिरिक्त आयुक्त विजया कंठे यांना दिला होता . विजया कंठे यांनी एका दिवसाच्या मुख्यमंत्र्याप्रमाणे डॉ.शिंदे यांनी केलेल्या अंतर्गत बदल्या थांबवून जैसे थे नियुक्त्या केल्या. हा प्रकार गाजल्यावर डॉ शिंदे परत एका दिवसासाठी आले. आणि त्यांनी विजया कंठे यांच्या ऑर्डरी रद्द केल्या . ही अदला बदलीचा बाब आजही उल्हासनगरात चर्चिली जात आहे.

विद्यमान हांगे 8 महिन्यात सेवानिवृत्त

दरम्यान उल्हासनगरचा पदभार हाती घेणारे आयुक्त अच्युत हांगे हे येत्या 8 महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत.यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता विकासकामांचा ठसा उमटवण्यासाठी हे महिने पुरेसे आहेत. घराघरात पाणी वेळेवर मिळावे,अस्वच्छता पुर्णतः नाहीशी करणे,स्वच्छभारत अभियान उल्हासनगर अग्रणी राहावे,रखडलेली विकासकामे मार्गी लावून ते पूर्णत्वास आणणे याकडे लक्ष देणार असून हाती जरी आठ महिने असले तरी उल्हासनगरकरांच्या मनात घर करून जाणार,असा विश्वास अच्युत हांगे यांनी व्यक्त केला.

 
 

संबंधित लेख