| Sarkarnama

भाजप-शिवसेना जागावाटप बाळासाहेब ठाकरे- प्रमोद महाजनांच्या फॉर्म्युल्यानुसार; रावसाहेब दानवे यांनी केले स्पष्ट 

योगेश बरवड
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

नागपूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांनी ठरविलेल्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका होतील, अशी घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी नागपुरातील पत्रकार परिषदेत केली.
 

नागपूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांनी ठरविलेल्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका होतील, अशी घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी नागपुरातील पत्रकार परिषदेत केली.
 
लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष दानवे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. नागपुरातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शिवसेनेकडून "एकला चलो'चा राग आळवला जात असला तरी सेनेसोबत युतीकरूनच निवडणुकांना सामोरे जाण्याची भूमिका आहे. जुन्या व समविचारी मित्रपक्षांनी एकत्र निवडणुका लढून मतविभाजन टाळावे ही भाजपाची भूमिका आहे. मित्रपक्षांच्या भांडणातून दुसऱ्याला संधी मिळू नये. 
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांनी भाजप-शिवसेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविला होता. या फॉर्म्युल्यानुसारच आगामी लोकसभा निवडणुकीत जागावाटप होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे भाजपने युतीसाठी आता एक पाऊल मागे येण्याची तयारी दर्शविल्याचे स्पष्ट झाले आहे. 

2014 च्या फार्म्युल्यानुसार भाजपकडे 26 तर शिवसेनेकडे 22 लोकसभा मतदारसंघ होते. या फार्म्युल्यानुसार पुढील लोकसभा निवडणुकीत जागावाटप होईल, असे दानवे यांनी स्पष्ट केले आहे.
 
लोकसभेसारखेच विधानसभा निवडणुकीतही 
लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र होणार नसल्याचे सांगून दानवे म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी अजून एक वर्ष आहे. फडणवीस सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नक्की होईल, परंतु मुहूर्त ठरलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नागपूर शहर भाजपचे अध्यक्ष व आमदार सुधाकर कोहळे उपस्थित होते.

संबंधित लेख