| Sarkarnama

मंत्रीपद मागणार नाही, मात्र दिले तर सोडणार नाही : गाडगीळ

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

दसऱ्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्‍यता आहे. यामध्ये सांगलीला  शंभर टक्के स्थान मिळेल. मी मंत्रीपद मागणार नाही. पण, पक्षाने जबाबदारी दिल्यास टाळणार नाही, ती स्वीकारणार.

- आमदार सुधीर गाडगीळ

सांगली : राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरु आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील कुणाला संधी मिळणार याकडे जिल्ह्याचे लक्ष 
लागले आहे. या शर्यतीत आता आमदार सुधीर गाडगीळही उतरले आहेत. मंत्रीपद मागणार नाही, पण पक्षाने जबाबदारी दिल्यास निश्‍चितपणे स्वीकारणार असल्याचे त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

दसऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार करण्याची शक्‍यता आहे. यामध्ये तरी सांगलीला स्थान मिळणार का? याची उत्सुकता लागली आहे. 

विधानसभेला चार आमदार निवडून देऊन सांगलीकरांनी भाजपच्या पारड्यात मोठे दान टाकले आहे. मात्र मंत्रीमंडळात सांगलीला 
स्थान मिळाले नाही. फडवणीस मंत्रीमंडळाचा अखेरचा विस्तार होण्याची चर्चा सुरु झाल्यानंतर यामध्ये जिल्ह्यातील कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता  आहे. सध्या विधान परिषदेचे सदस्य असलेले सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्रीपद मिळाले आहे. ते एकमेव सांगलीचे मंत्री आहेत. मात्र तेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून आलेले आहेत.

सलग पंधरा वर्ष तीन कॅबिनेट मंत्री लाभलेल्या सांगलीला भाजपने मात्र भरभरुन यश दिल्यानंतरही निराश केले आहे. आता अखेरच्या विस्तारात तरी जिल्ह्याला संधी मिळेल अशी आशा आहे. 

जिल्ह्यात भाजपचे चार आमदार आहेत. त्यापैकी कुणाचीही वर्णी लागू शकते. आमदार सुरेश खाडे, आमदार विलासराव जगताप इच्छूक आहेतच. त्यांना मंत्रीपद मिळण्यासाठी शिष्टमंडळ  मुख्यमंत्र्यांना भेटले असल्याचीही चर्चा आहे. आमदार शिवाजीराव नाईक यांचेही नाव सातत्याने विस्ताराच्या चर्चेत असते. त्यांच्या पारड्यात वजन टाकण्यासाठी स्वत: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रयत्नशील असल्याचे
समजते.  आमदार सुधीर गाडगीळ यांचेही राज्यात वजन चांगले वजन आहे. संघाचे निष्ठावान असणाऱ्या आमदार गाडगीळ यांनाही मंत्रीपदाची लॉटरी लागू शकते.  त्यांनी आपण मंत्रीपद मागणार नाही, पण पक्षाने जबाबदारी दिल्यास टाळणार नाही, असे स्पष्ट करुन आपणही मंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे सूतोवाच  केले आहे. 

संबंधित लेख