| Sarkarnama

विदर्भाच्या विजय तेलंग यांनी केली होती इम्रान खान यांची 'पिटाई'!

नरेंद्र चोरे 
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पाकिस्तानचे अष्टपैलू क्रिकेटपटू आणि आताचे पंतप्रधान इम्रान खान यांनी उमेदीच्या काळात भल्या भल्या फलंदाजांच्या दांड्या गुल करून जगभरातील क्रिकेटप्रेमींची वाहवा मिळविली. मात्र, याच इम्रान खान यांची एका सराव सामन्यादरम्यान विदर्भाच्या विजय तेलंग यांनी जोरदार पिटाई करून पाकिस्तान संघाला अक्षरश: सळो की पळो करून सोडले होते. जयपुरातील या घटनेचा किस्सा स्वत: इम्रानखान यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवला आहे.

नागपूर  : पाकिस्तानचे अष्टपैलू क्रिकेटपटू आणि आताचे पंतप्रधान इम्रान खान यांनी उमेदीच्या काळात भल्या भल्या फलंदाजांच्या दांड्या गुल करून जगभरातील क्रिकेटप्रेमींची वाहवा मिळविली. मात्र, याच इम्रान खान यांची एका सराव सामन्यादरम्यान विदर्भाच्या विजय तेलंग यांनी जोरदार पिटाई करून पाकिस्तान संघाला अक्षरश: सळो की पळो करून सोडले होते. जयपुरातील या घटनेचा किस्सा स्वत: इम्रानखान यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवला आहे.

कर्णधार आसिफ इक्‍बालच्या नेतृत्वात पाकिस्तान संघ सहा कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी 1979-80 मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. त्या दौऱ्यातील पाकिस्तान व मध्य विभागादरम्यानचा तीनदिवसीय सराव सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. पाकिस्तान संघात कर्णधार इक्‍बालशिवाय झहीर अब्बास, वसीम राजा, वसीम बारी, माजिद खान, सिकंदर बख्त, जावेद मियॉंदाद, युवा इम्रान व अब्दुल कादीरसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंचा भरणा होता. तर पार्थसारथी शर्माच्या नेतृत्वातील मध्य विभाग संघात विनोद माथूर, अनिल भानोत, गोपाल शर्मा, सुरेश शास्त्रींसह विदर्भाच्या तेलंग व अनिल देशपांडेंचा समावेश होता.

सराव सामन्यात चांगली कामगिरी करून कसोटी मालिकेसाठी आवश्‍यक आत्मविश्‍वास मिळविण्याच्या उद्देशाने पाकिस्तान संघ मैदानात उतरला. मियाँदादच्या नाबाद शतकाच्या जोरावर पाकिस्तानने 4 बाद 303 धावांवर पहिला डाव घोषित केला. मध्य विभागाचा डाव झटपट गुंडाळण्याच्या इराद्याने पाहुण्या संघाचे गोलंदाज मोठ्या आविर्भावात मैदानात उतरले. इम्रान यांनी माथुरला पहिल्याच षटकात माघारी पाठवून आपले इरादे दाखवूनही दिले. मात्र, त्यानंतर इम्रान व अन्य गोलंदाजांची तेलंग, भानोत व पार्थसारथी शर्माने जी पिटाई केली, ती आजही अनेकांच्या स्मरणात आहे. 

आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेले तेलंग गोलंदाजांवर अक्षरश: तुटून पडले. त्यांनी युवा इम्रानच्या पहिल्याच चेंडूवर षट्‌कार ठोकून आपले आक्रमक मनसुबे दाखवून दिले होते. तेलंग यांना चेंडू कुठे टाकावा, हे इम्रान यांना कळत नव्हते. तेलंग यांचा रौद्रावतार बघून पाकिस्तानचे अन्य गोलंदाजही चांगलेच सैरभैर झाले होते. भागीदारी मोडीत काढण्यासाठी कर्णधार इक्‍बालने तब्बल आठ गोलंदाजांना आजमावले होते. मियाँदाद व झहीर अब्बासकडूनही त्याने गोलंदाजी करविली. परंतु, कुणाचाही त्यांच्यावर परिणाम झाला नाही. अखेर कादीरने तेलंग याची विकेट घेतल्यानंतरच हे तुफानी वादळ शमले. तेलंग यांच्या 66 धावांच्या आक्रमक खेळीने स्टेडियमवर उपस्थित क्रिकेटप्रेमींचे चांगलेच मनोरंजन झाले. सामना अपेक्षेप्रमाणे अनिर्णीत राहिला. पण, तेलंग यांची ती खेळी इम्रान खान यांच्यासह साऱ्यांच्याच आठवणीत राहिली. 

आत्मचरित्रात घटनेचा उल्लेख
या सामन्यात आलेला काहीसा कटू अनुभव इम्रान खान यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिला असल्याची माहिती, विदर्भाचे प्रसिद्ध सांख्यिकीतज्ज्ञ प्रकाश तपस्वी यांनी दिली. 1979 च्या भारत दौऱ्याच्या वेळी विदर्भाच्या एका फलंदाजाने माझी पिटाई केली होती. त्याची फलंदाजी बघून मी खूप प्रभावित झालो होतो, अशा शब्दांत इम्रान खान यांनी या घटनेचा आत्मचरित्रात उल्लेख केला आहे. प्रसिद्ध क्रिकेट लेखक आर. मोहन यांनीही मद्रासच्या वर्तमानपत्रात या प्रसंगाचा त्यावेळी प्रकर्षाने उल्लेख केल्याचे तपस्वी यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख