23 questions to sadabhau khot | Sarkarnama

तेवीस प्रश्‍न : सदाभाऊ, कृत्यांचा पश्‍चात्ताप होतोय कां? 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 जुलै 2017

सदाभाऊंना उत्तर देण्यासाठी दिलेल्या पहिल्या मुदतीत ते खुलासा देऊ शकले नाहीत. आषाढी वारीचे कारण सांगून त्यांनी उत्तर टाळले. आता चौकशी समितीने त्यांना 21 जुलैची मुदत दिली आहे. त्यानुसार ते पुण्यात चौकशी समितीला भेटतील की न भेटताच वेगळी भूमिका जाहीर करतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 
 

पुणे: "गेल्या काही दिवसांत आपण चळवळीविरोधात केलेली कृत्ये अंतरात्म्याला स्मरुन तपासली तर, चळवळीतील एक लढाऊ पार्श्‍वभूमीचा कार्यकर्ता म्हणून आपणास पश्‍चात्ताप होत आहे काय? होत असल्यास त्याच पापक्षालन करावे असे वाटते काय? ' असा प्रश्‍न स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चौकशी समितीने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना विचारला आहे. याप्रकारचे 23 प्रश्‍न सदाभाऊंना देण्यात आले असून त्यांचा खुलासा करण्यासाठी 21 जुलैची मुदत देण्यात आली आहे. 

गेले दोन महिने स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राजू शेट्टी विरुद्ध सदाभाऊ खोत हा वाद धुमसतो आहे. सदाभाऊंना भाजपने जोरदार ताकद दिली आहे, तर दुसरीकडे शेट्टींनी भाजपविरोधात मोहिम उघडली आहे. या विषयाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी पुण्यात झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दशरथ सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफळे, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रवीकांत तुपकर, सतीश काकडे यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. या समितीने एकूण 23 प्रश्‍न सदाभाऊंना पाठवले असून त्यांचा खुलासा मागितला आहे. 

मुख्य प्रश्‍न स्वामिानाथन आयोगाबाबतचा विचारण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वामीनाथन आयोग करण्याचे आश्‍वासन दिले होते, मात्र ते त्यांनी पाळले नाही. हे आश्‍वासन पाळणे शक्‍य नसल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायायलयात दाखल केले आहे. याप्रकरणात मोदी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे की नाही? यावर आपले मत काय?, असे सदाभाऊ यांना विचारण्यात आले आहे. खासदार राजू शेट्टी यांनी काढलेल्या आत्मक्‍लेश यात्रेत पुर्ण 9 दिवस सहभागी होण्याची सूचना संघटनेच्यावतीने करण्यात आली होती. मात्र आत्मक्‍लेश यात्रेत सहभागी होण्याचे टाळून भाजपच्या शिवार संवाद यात्रेत कां सहभागी झाला, असेही विचारण्यात आले आहे. 

सदाभाऊंनी इलेक्‍ट्रॉनिक मिडीयामधील डिबेट शोमध्ये संघटनेच्याविरोधात भूमिका मांडली, नगरपालिका निवडणुकांत बहुतांश ठिकाणी ते स्वाभिमानीच्या प्रचाराला गेले नाहीत, राजू शेट्टी व कार्यकर्त्यांच्यावर दबाव आणतात,असे आरोप केले, याबद्दलही खुलासा मागविण्यात आला आहे. 

 

संबंधित लेख