1.7 million government employees are on strike | Sarkarnama

सतरा लाख सरकारी कर्मचारी संपावर

संजय मिस्कीन
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018


मागील तीन वर्षापासून सरकारने कर्मचाऱ्यांना केवळ आश्‍वासन दिले मात्र ठोस निर्णय घेतलेला नाही. सरकारसोबत चर्चेची तयारी आहेच पण निर्णय व्हायला हवा. हा संप सरकारच्या निष्काळजीपणा व दिरंगाईच्या कारभारामुळे लादण्यात आला आहे.

मिलींद सरदेशमुख, अध्यक्ष, बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघ 

मुंबई : सरकारी कर्मचारी संपाचा पहिल्याच दिवसाचा दणका सरकारी कामकाजाला बसला आहे. मंत्रालयात मंत्री कार्यालय वगळता इतर सर्व विभागातील 96 टक्के कर्मचारी संपात सहभागी झाले.

पहिल्याच दिवशी संपाला मिळालेला प्रतिसाद पाहत उद्या व परवा संपाची दाहकता आणखीन वाढण्याची शक्‍यता आहे. दरम्यान संपात सहभागी कर्मचार्यांना सरकारने "मेस्मा' अंतर्गत कारवाईची नोटीस बजावली आहे. राज्यभरातील सुमारे 17 लाख कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

राज्यात सरकारच्या मुळ 32 विभागातील कर्मचारी संपात सहभागी आहेत. मंत्री कार्यालयात कर्मचारी हजर असले तरी राज्यातील सर्वच कार्यालयात संपामुळे शंभर संप यशस्वी झाल्याचा दावा कर्मचारी अधिकारी संघठनेनं केला आहे.

आज राज्यभरात चतुर्थ व तृतीय श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले. यामधे मंत्रालयासह राज्यातील जिल्हा परिषदा, जिल्हाधिकारी कार्यालये, महसुल विभाग, विक्रीकर, सर्व मुद्रणालये, निबंधक कार्यालये, उत्पादन शुल्क कार्यालयांसह 32 विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. या संपामधे सर्व शासकिय रूग्णालये, आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतल्याने रूग्ण व नागरीकांची गैरसोय झाल्याचे चित्र आहे.

मागील तीन वर्षापासून सतत सरकारसोबत चर्चा, बैठका घेतल्यानंतरही तोडगा निघत नसल्याने कर्मचाऱ्यांना संप पुकारण्याशिवाय पर्याय नसल्याचे महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघठनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख