| Sarkarnama

दिवाळी फराळ पार्टीतून झाली आमदारपुत्राच्या प्रमोशनाची पेरणी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

नगर : बहुतेक सर्वच राजकीय मंडळींच्या घरी दिवाळीनंतर राजकीय फराळाची पार्टी होते, पण या वर्षी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी जरा वेगळाच मूड होता. नुतन बंगल्याच्या वास्तूपुजनाचेही त्याला निमित्त होते. त्यात आमदारपुत्र अक्षय कर्डिले यांची खरी लगबग कार्यकर्त्यांना जाणवली. राजकीय संघटन करण्याचे सूत्रच जणू अक्षयकडे आमदारांनी सुपूर्द केल्याची झलक दिसून आल्याचे दडून राहिले नाही. 

नगर : बहुतेक सर्वच राजकीय मंडळींच्या घरी दिवाळीनंतर राजकीय फराळाची पार्टी होते, पण या वर्षी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी जरा वेगळाच मूड होता. नुतन बंगल्याच्या वास्तूपुजनाचेही त्याला निमित्त होते. त्यात आमदारपुत्र अक्षय कर्डिले यांची खरी लगबग कार्यकर्त्यांना जाणवली. राजकीय संघटन करण्याचे सूत्रच जणू अक्षयकडे आमदारांनी सुपूर्द केल्याची झलक दिसून आल्याचे दडून राहिले नाही. 

गेल्या दोन तपांपासून विधानससभेच्या सदस्यत्त्वाची खुर्ची सांभाळत आमदार कर्डिले यांनी जनसंपर्क वाढविला आहे. 1995 मध्ये ते प्रथमच आमदार झाले, त्यावेळी त्यांनी मतदार संघात मतदारांना शुभेच्छापत्रे पाठविली. बहुतेक मतदार ग्रामीण भागातील असल्याने शुभेच्छापत्रांचा तितकासा फायदा त्यांना झाल्याचे जाणवले नाही. उलट झालेला खर्च मोठा असल्याचे लक्षात आले. हाच खर्च फराळावर खर्च केला, तर आपल्या मतदारांना फराळ मिळेल, शिवाय आमदारांच्या घरी फराळ केल्याचा आनंदही मिळेल, असे त्यांना वाटले. त्यानुसार दुसऱ्या वर्षापासून बुऱ्हाणनगर येथील निवासस्थानी त्यांनी फराळ कार्यक्रम आयोजित केला. त्यानुसार गेल्या वीस वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. फराळाच्या निमित्ताने राजकीय विषयांवर चर्चाही होते. हा मेळावा राजकीय नसतो, तर सर्वच पक्षातील चाहते, आप्तेष्ठ व मतदार संघातील सर्वच लोकांना निमंत्रण असते. त्यानुसार या स्नेहमेळाव्यास सर्वच पक्षांतील कार्यकर्त्यांचीही हजेरी असते. 

या वर्षीचा मेळावा खास होता. आमदार कर्डिले भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. साहजिकच पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आवर्जुन हजेरी लावली. तसेच कर्डिले यांचे व्याही राष्ट्रवादी कॉग्रेसमधील विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप, जावई नगर शहर मतदार संघाचे आमदार संग्राम जगताप तेथे सर्वच कार्यकर्त्यांशी मुक्त चर्चा करीत होते. या सर्वांमध्ये आमदारपुत्र कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीत रमले होते. 
अक्षय कर्डिले यांचा प्रवास राजकीय दिशेने 
आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय हे सध्या युवा नेते म्हणून युवा कार्यकर्त्यांची बांधणी करीत आहेत. आगामी काळात विधानसभा मतदार संघ अक्षयसाठी शिल्लक नसला, तरी विविध संस्थांवर त्यांची वर्णी कशी लागेल, याचाच प्रयत्न आमदार कर्डिले यांच्याकडून होऊ शकतो. आगामी विधानसभेसाठी राहुरी मतदार संघातून कर्डिले हेच उमेदवार असतील, मात्र प्रचाराची सूत्रे बऱ्यापैकी अक्षय यांच्याकडे असेल, असे सूचित होत आहे. त्यामुळे हा स्नेहमेळाव्यात अक्षयच्या प्रमोशनची पेरणीच झाल्याचे चित्र दिसून येत आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून अधिकृतपणे ते राजकारणात प्रवेश करणार असले, तरी ते दिवस आता खूप दूर नाहीत, हेच जणू या मेळाव्यातून दिसून आले. 

संबंधित लेख