| Sarkarnama

गाळ काढण्यासाठी गिरीश महाजन उतरले नदीपात्रात

संपत देवगिरे
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

आपला परिसर, शहर, जिल्हा, स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र असल्याने देशभरातील भाविक येथे येतात. देशातील स्वच्छ शहर करण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातील दोन तास स्वच्छतेसाठी द्यावेत- गिरीश महाजन

नाशिक : गोदावरी स्वच्छतेसाठी काठावरुन अनेकांनी उपदेश, मार्गदर्शन केले आहे. मात्र, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड दिली. त्यांनी स्वतःच थेट नदीपात्रात उतरुन गाळ, घाण काढण्यास प्रारंभ केला. पालकमंत्र्यांनीच बाह्या सरकवल्याने अधिकारीही पात्रात उतरले अन् कृतीशील स्वच्छता मोहीम पार पडली.

जलसंपदा मंत्री महाजन यांचा सळसळता उत्साह, अनेक कामात पुढाकार घेण्याची धडाडी यामुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. ब-याचदा ते नेते कमी व जमिनीवर उतरुन काम करणारे कार्यकर्ते अधिक वाटतात. त्याची प्रचिती सोमवारी काल त्र्यंबकेश्वरवासियांनाही आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्र्यंबकेश्वरला स्वच्छता मोहिम झाली. त्यासाठी शपथ घेण्याचा कार्यक्रम होता. शपथ पार पडल्यावर मंत्री गाडीत बसून निघून जातील असे अनेकांना वाटले. मात्र, महाजन यांनी कार्यक्रम संपल्यावर त्यांनी थेट घमेले हाती घेऊन गोदासंगमातील घाण काढण्यास सुरवात केली. त्यामुळे उपस्थित साधू, अधिकारीही फार काळ काठावर थांबू शकले नाही. त्यांनाही नदीपात्रात उतरावे लागले. जवळपास दिड तास स्वच्छता झाल्यावर धाम्रिक विधीच्या साहित्य, गाळाने अस्वच्छ झालेल्या अहिल्या गोदा संगमातून पाणी प्रवाही झाले.
 
जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.,मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, नगराध्यक्षा तृप्ती धारणे, मुख्याधिकारी चेतना केरुरे, सोमेश्वरानंद महाराज, बिंदू महाराज, तहसिलदार महेंद्र पवार यांनीही या मोहिमेत भाग घेतला.

'स्वच्छता हीच सेवा' या उपक्रमांतर्गत त्र्यंबकेश्वर येथे राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत सात प्रमुख भागात पथकामार्फत स्वच्छता झाली. जुने बसस्थानक येथे तीन टन, नवे बसस्थानक एक टन, गोदावरी नदी चार टन, कृष्णा हॉटेलची मागची बाजू एक टन, वाहनतळ दीड टन, श्रीचंद्र घाट आणि रिंगरोड प्रत्येकी दीड टन असे एकूण 13.5 टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. स्वयंसेवकांसह विविध संस्थांनी श्रमदानात सहभाग घेतला.

 

संबंधित लेख