| Sarkarnama

कॉंग्रेसचे आमदार भारत भालकेंची सहकारमंत्र्यांशी वाढली जवळीक 

भारत नागणे 
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी अलीकडे सोलापूर जिल्ह्यातील कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांशी सलगी वाढवली आहे. यामध्ये पंढरपूरचे कॉंग्रेसचे आमदार भारत भालकेंशी अधिकच जवळीक साधल्याचे वारंवार दिसून येत आहे. मंगळवेढा येथे झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात दोघांनीही एकमेकांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले होते. आमदार भालके आणि सहकारमंत्री देशमुखांच्या राजकीय मैत्री विषयी जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. 

पंढरपूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी अलीकडे सोलापूर जिल्ह्यातील कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांशी सलगी वाढवली आहे. यामध्ये पंढरपूरचे कॉंग्रेसचे आमदार भारत भालकेंशी अधिकच जवळीक साधल्याचे वारंवार दिसून येत आहे. मंगळवेढा येथे झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात दोघांनीही एकमेकांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले होते. आमदार भालके आणि सहकारमंत्री देशमुखांच्या राजकीय मैत्री विषयी जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. 

जिल्ह्यात भाजपमध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे उघड-उघड दोन गट आहेत. पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, आमदार बबनराव शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, माळशिसरचे उत्तम जानकर यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले आहेत. 

जिल्हाच्या राजकारणात आजही शिंदे-परिचारकांचे वर्चस्व कायम आहे. त्यामुळे पालकमंत्री नेहमीच सहकारमंत्र्यांपेक्षा वरचढ ठरत आहेत. हीच सल सहकारमंत्री देशमुखांना सतावत आहे. यातूनच सहकारमंत्री देशमुखांनी शत्रू तो मित्र या राजकीय न्यायाने जिल्ह्यातील कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जवळीक साधली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील, कॉंग्रेसचे आमदार भारत भालके, जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष कल्याणराव काळे यांच्यासह इतर नेत्यांशी त्यांनी सलगी वाढवली आहे. 

मंगळवेढा येथे नुकतीच राज्यस्तरीय ज्वारी व मका महापरिषद पार पडली. परिषदेचे उद्‌घाटन सहकारमंत्री देशमुखांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला कॉंग्रेसचे आमदार भारत भालके आवर्जून उपस्थित होते. या वेळी मंत्री देशमुख यांनी आमदार भालकेंनी केलेल्या सहकार्याची कबुली दिली. एवढेच नव्हे, तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क देण्याविषयीचे विधेयक विधानसभेत मांडल्यानंतर सर्वप्रथम आमदार भालकेंनी माझे अभिनंदन केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

माझ्या अनेक निर्णयांना त्यांनी अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला आहे. सभागृहात त्यांना मला पाठिंबा देता येत नसला तरी सभागृहाबाहेर मात्र त्यांचे मला चांगले सहकार्य असते असे त्यांनी जाहीर सभेत सांगितले. यावेळी मात्र आमदार भालकेंची चांगलीच पंचायत झाल्याचे दिसून आले. 

पंढरपूर व मंगळवेढ्याच्या राजकारणात परिचारक व भालके यांचे दोन प्रबळ गट आहेत. 2009 आणि 2014 या दोन्ही निवडणुकीत आमदार भालकेंनी बाजी मारली आहे. 2014 मध्ये विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारकांना पराभूत करत विजय मिळवला होता. त्यानंतर परिचारकांनी राष्ट्रवादीला सोडून भाजपशी जवळीक साधत विधान परिषदेची आमदारकी मिळवली. त्यानंतर पुन्हा परिचारकांनी विधानसभेच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आमदार भालकेंनी देखील अनेक नाराजांना पुन्हा एकत्रित करत 2019 साठी पुन्हा दंड थोपटले आहेत. परंतु आमदार भालके येणारी निवडणूक भाजपकडून लढणार की पुन्हा कॉंग्रेसच्या बाजूने लढवणार हे मात्र अजून तरी अनिश्‍चित आहे. मात्र देशमुखांच्या जवळीकतेमुळे भालकेंच्या आगामी राजकीय वाटचालीकडे जिल्ह्यातील राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे. 

संबंधित लेख