| Sarkarnama

आमदार अनिल गोटेंच्या असभ्य भाषेला आवर घालणार कोण?

निखिल सूर्यवंशी
बुधवार, 26 जुलै 2017

भाषेबाबत संघ, भाजपची चुप्पी

धुळे : स्वकियांसह विरोधकांवर आरोप, टीकेचे आसूड ओढणारे भाजपचे शहरातील आमदार अनिल गोटे यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या प्रसिध्दीपत्रकात सातत्याने अश्‍लिल, बिभत्स, कमरेखालच्या भाषेचाच अधिक वापर होत असल्याने तो महिला वर्गासह अनेकांच्या टीकेचा गंभीर विषय बनला आहे. खुद्द आमदार गोटे आणि त्यांचे समर्थक अशी पत्रके 'सोशल मीडिया'वर 'व्हायरल' करत असल्याने अधिकाऱ्यांसह राजकीय, सामाजिक वर्तुळात आश्‍चर्य आणि चिंताही व्यक्त केली जात आहे.

भाषेबाबत संघ, भाजपची चुप्पी

धुळे : स्वकियांसह विरोधकांवर आरोप, टीकेचे आसूड ओढणारे भाजपचे शहरातील आमदार अनिल गोटे यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या प्रसिध्दीपत्रकात सातत्याने अश्‍लिल, बिभत्स, कमरेखालच्या भाषेचाच अधिक वापर होत असल्याने तो महिला वर्गासह अनेकांच्या टीकेचा गंभीर विषय बनला आहे. खुद्द आमदार गोटे आणि त्यांचे समर्थक अशी पत्रके 'सोशल मीडिया'वर 'व्हायरल' करत असल्याने अधिकाऱ्यांसह राजकीय, सामाजिक वर्तुळात आश्‍चर्य आणि चिंताही व्यक्त केली जात आहे.

आमदार असे कसे करू शकतात? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात घडल्याचा तोरा मिरविणाऱ्या आमदार गोटेंच्या या 'शब्द संस्कारां'वरही सध्या शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यावर 'शाखेकरी' मात्र अद्यापही गप्पच आहेत. आमदार गोटे यांच्याकडून विविध विषयांवर दिल्या जात असलेल्या प्रसिद्धिपत्रकात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, स्व-पक्षीय भाजपचे नेते, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि पत्रकार टीकेचे लक्ष्य ठरत आहेत. त्यांना उद्देशून अत्यंत खालच्या पातळीची, अश्‍लील, बीभत्स, कमरेखालची भाषा वापरून त्यांच्या कौटुंबिक पातळीवर घसरत, महिलांचा अत्यंत हीन भाषेत उद्धार करणारी भाषा वापरत आमदार गोटे सातत्याने टीका करत आहेत. तो गंभीर चर्चेचा विषय बनला आहे.

'सोशल मीडिया'वर अग्रेसर
आमदारांबाबत विसंगत चित्र

बीभत्स भाषेतील टीकेचे पत्रक 'सोशल मीडिया'वर 'व्हायरल' करण्यात आमदार गोटे व समर्थक अग्रेसर दिसतात. भाजपसह अन्य काही व्हॉट्‌सअॅप ग्रुप, फेसबुकवरील सदस्य महिलांचा आदर न राखता अशी पत्रके 'पोस्ट' केली जात असल्याचे दिसून येते. आमदारांचा समाजात प्रभाव असतो. सामाजिक परिवर्तनात आमदारांची भूमिका महत्वाची ठरत असते. मात्र, येथे नेमके याउलट, विसंगत चित्र दिसून येते. आमदार अशी भाषा वापरत असतील तर, ते समाज परिवर्तन कसे करू शकतात, असा अनेक प्रश्‍न धुळेकर उपस्थित करत आहेत. अधिकारी, राजकीय, सामाजिक वर्तुळातही हा चर्चेचा विषय आहे.

महापालिकेत 'महिला राज' आणण्याची भाषा करणारे आमदार गोटे महिलांविषयी अत्यंत हीनदर्जाची भाषा प्रसिध्दीपत्रकात व 'सोशल मीडिया'वरील 'पोस्ट'मध्ये वापरत असल्यानेही तो टिकेचा ठरला आहे.

बोलणे आणि कृतीत अंतर
आमदार गोटे यांनी 28 जूनला जम्बो प्रसिध्दीपत्रक दिले होते. त्यात त्यांनी म्हटले की, 'मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे व त्याचा मला सार्थ अभिमान आहे. संघ स्थानावर आम्हाला कधीही धार्मिक किंवा विद्वेषाचे डोस पाजले जात नाहीत. भाजप पक्षात आलेल्या काही दलबदलूंचे संस्कारशून्य विचार आणि संघाच्या मूळ विचारसरणी यात जमीन अस्मानचा फरक आहे.'

असे सभ्य संस्काराचे विचार एकीकडे पत्रकात उगाळायचे आणि प्रत्यक्षात 'सोशल मीडिया'सह प्रसारमाध्यमांना दिलेल्या पत्रकात अश्‍लिल, बिभत्स, कमरेखालच्या भाषेचा यथेच्छ वापर करायचा, हा आमदार गोटे यांचा फंडा अनेक संभ्रम निर्माण करणारा ठरत असल्याचे म्हटले जाते. यातून आमदार गोटे यांच्या कथीत विकासाबरोबर भूमिकेबाबत 'कथनी व करनी'त अंतर असल्याचे धुळेकर बोलत आहेत.

स्वयंसेवक संघाची शिकवण?
प्रसिध्दीपत्रकातील आमदार गोटे यांची अश्‍लिल, बिभत्स, महिलांचा अवमान करणारी भाषा पाहिली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात किंवा शाखेत अशा भाषेविषयी शिकवण, संस्कार दिले जातात का, असा प्रश्‍न धुळेकरांमध्ये चर्चेत आहे. आमदार गोटे यांच्या अशा भूमिकेबाबत स्वयंसेवक संघासह भाजपने अद्याप आपली कुठलीही ठोस भूमिका धुळेकरांपुढे जाहीर केलेली नाही. आमदार गोटे स्वकीय डॉ. भामरे यांचाही अश्‍लाघ्य भाषेत कौटुंबिक उद्धार करत असताना भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निमूटपणे हे सर्व चित्र पाहात असल्याबद्दल सखेद आश्‍चर्य व्यक्त होते. अर्थात संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी अशोभनीय कार्यशैली असलेल्या आमदार गोटे यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत शाश्‍वत विकास कामांची वाट धरली आहे. असे असताना आमदार गोटे यांनी भाषा 'शाखे'त नेमकी कुठून 'पीएच. डी.' मिळविली आहे? याचा शोध असंख्य धुळेकर घेताना दिसत आहेत. या प्रकारामुळे भाजप, संघाच्या प्रतिमेला तडा जात असल्याचे मानले जाते. प्रसिध्दीपत्रकात, सोशल मीडियावरील पोस्टमध्ये माय- माऊल्या, अशी भावनिक साद घालायची आणि दुसरीकडे विरोधकांच्या कुटुंबातील महिलांना उद्देशून हीन दर्जात भाषा वापरायची यामुळे नातेवाईकांमध्ये संतापाची लाट आहे. पुरूषांनाही लाज वाटेल, अशा भाषेत आमदार गोटे यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या पत्रकांमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

संबंधित लेख