| Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोसाठी शंभर कोटींचा पूल पाडावा लागणार 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 20 जुलै 2017

 

 

पिंपरी ः पिंपरी-चिंचवड शहराच्या पश्‍चिमेकडील प्रवेशद्वारावर बांधण्यात येत असलेल्या शंभर कोटी रुपये खर्चाचा उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरच्या आराखड्यात बदल करा अन्यथा न्यायालयात जाऊ, असा इशारा भाजपचे शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनी आज (ता.20) दिला. पालिकेतील सत्ताधारी भाजपने नुकत्याच मंजूर केलेल्या या प्रकल्पाला त्यांच्याच पदाधिकाऱ्याने विरोध केल्याने हा भाजपला घरचा आहेर समजला जात आहे. त्यातून शहर भाजपमध्ये सारे काही आलबेल नसल्याचेही दिसून आले असून जुन्या व नव्यातील सुप्त संघर्ष यानिमित्ताने पुन्हा बाहेर आला आहे.दरम्यान,या विरोधामुळे सुरू होण्यापूर्वीच या प्रकल्पाचे काम अडचणीत सापडले आहे. 

शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या व सध्या पालिकेच्या स्थायी समिती सभापती असलेल्या सीमा सावळे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले आमदार व सध्या भाजपचे शहराध्यक्ष असलेले लक्ष्मण जगताप यांच्या त्या कट्टर समर्थक आहेत. तर, थोरात हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेले भाजपचे जुने व एकनिष्ठ कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. त्यांनी आज पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन वरील मागणी करीत इशारा दिला. 

यासंदर्भात थोरात म्हणाले,""मेट्रोच्या दुसऱ्या टप्यात तिचा विस्तार निगडीपर्यंत होणार आहे. हिंजवडी ते तळवडे मोनोरेल किंवा मेट्रो होण्याची शक्‍यता भविष्यात आहे. त्यावेळी पूल उभारणी होत असलेल्या भक्तीशक्ती चौकातच मेट्रोचे स्टेशन होणार आहे. त्यामुळे दरम्यान उभारणी झालेला हा शंभर कोटीचा भक्तीशक्ती चौकात मेट्रोच्या मार्गातच येणारा हा पूल पाडावा लागेल. मेट्रो किंवा मोनोरेल प्रकल्पाला तो अडसर होऊ शकतो. मेट्रो, मोनोरेल आदी तत्सम प्रकल्प यामुळे रेंगाळू शकतात. तसेच तांत्रिक अडचणी निर्माण होऊन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मेट्रोचा विचार न करता तयार करण्यात आलेल्या या पूल व तेथील ग्रेड सेपरेटरच्या आराखड्यात बदल करणे गरजेचे आहे. नाहीतर, जनतेचे शंभर कोटी रुपये पाण्यात जातील. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात तयार करण्यात आलेला या प्रकल्पाचा जुना आराखडा रद्द करून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रचनात्मक बदल करून नियोजित मेट्रो आणि भविष्यातील प्रकल्पांबाबत दूरदृष्टी ठेवून नव्याने आराखडा तयार करण्याची गरज आहे. त्यानुसारच काम सुरू करावे, अन्यथा महापालिका प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात जाऊ''. 

पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीत समावेश झाला असल्याने शहराचा प्रत्येक प्रकल्प स्मार्ट असणे व त्यासाठी पालिकेने स्मार्ट काम करणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांच्या भोंगळ कारभारामुळे कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील वाकड येथे उभारण्यात आलेला उड्डाणपूलही असून अडचण नसून खोळंबा ठरला आहे. तर, नाशिक फाटा येथील उड्डाणपुलामुळे तेथे मेट्रोचा मार्ग वळवावा लागला आहे''. 
-अमोल थोरात 
 

संबंधित लेख