राष्ट्रपती निवडणुक : 288 आमदारांपैकी फक्त  क्षितीज ठाकूर अनुपस्थित 

राष्ट्रपती निवडणुक : 288 आमदारांपैकी फक्त  क्षितीज ठाकूर अनुपस्थित 

मुंबई : राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद विरूध्द मीराकुमार या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 288 आमदारांपैकी 287 आमदारांनी मतदान केले. नालासोपारा येथील आमदार आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांचे पूत्र क्षितीज ठाकूर परदेशात गेले असल्याने त्यांचे एक मत पडले नाही. 

महाराष्ट्रात सत्ताधारी गटाने 200 आमदार कोविंद यांना मतदान करतील असा अंदाज वर्तवला आहे.मतकुटीचा संभाव्य धोका लक्षात घेवून कॉंग्रेसने आज दिवसभर विधीमंडळातील हालचालींकडे लक्ष ठेवले होते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने आमच्या सर्व आमदार तसेच खासदारांनी मीरा कुमार यांना मतदान केल्याचे घोषित केले आहे. भाजप आणि शिवसेनेच्या मतांच्या बेरजेपेक्षा जास्त मते मिळतील असा विश्‍वास सत्ताधारी गोटातून व्यक्‍त केला जातो आहे.अपक्ष आमदार रवी राणा यांनी 6 अपक्षांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर विश्‍वास असलेल्या काहीजणांनी कोविंद यांना मतदान केले असल्याची माहिती पत्रकारांना दिली.20 तारखेला मतमोजणीच्या वेळी चमत्कार समोर येईल असा विश्‍वास सत्ताधारी गटातर्फे व्यक्‍त केला जातो आहे. 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विधानसभेचे सदस्य असलेल्यांनाच मतदानाचा अधिकार आहे.महाराष्ट्राच्या विधानसभेत सध्या भाजपचे 123 
आमदार आहेत तर शिवसेनेच्या सदस्यांची संख्या 63 आहे.याबरोबरच सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची संख्या सुमारे 6 आहे.या तीन गटांची एकत्रित बेरीज असली तरी महाराष्ट्रातून कोविंद यांना किमान 200 मते मिळतील असा अंदाज गेल्या काही दिवसांपासून व्यक्‍त केला जातो आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोविंद यांचे पारडे जड असताना महाराष्ट्रातून त्यांना अतिरिक्‍त मतांची कुमक मिळणार हे स्पष्ट दिसते आहे. पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा विषय हाताळला जाणार असल्याने सत्तापक्षासाठी अडचणीच्या ठरणाऱ्या या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी गटाला मते फोडता आली तर मुख्यमंत्र्यांना त्यामुळे अधिकचे समर्थन असल्याचे चित्र निर्माण होईल. मात्र अशी अधिकची कुमक मिळू नये यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने उत्तम काळजी घेतली असल्याचे सांगण्यात येते आहे. 

मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कितीही गाजावाजा केला तरी कॉंग्रेसची आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची मते कुठेही वळणार नाहीत असे मानले जाते. कॉंग्रेस आमदारांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच मते दिली असल्याची माहिती आमदार अनंत गाडगीळ यांनी दिली. 

मतपेटी दिल्लीकडे 
महाराष्ट्रातल्या आमदारांनी मतदानाचा अधिकार मुंबईत बजावला असला तरी आमदारांची मते असलेली पेटी दिल्लीला रवाना होणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com