मुख्यमंत्र्यांनी लावलेला पिंपळ बकरीने खाल्ला...

 मुख्यमंत्र्यांनी लावलेला पिंपळ बकरीने खाल्ला...

अकोला : भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 3 जून 2015 रोजी पर्यावरण सप्ताहाचे उद्‌घाटन करताना तालुक्‍यातील घुसर येथे मुख्यमंत्र्यांनी लावलेले पिंपळाचे रोपटे बकरीने खाल्ले आहे. दस्तरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोपट्याची निगा राखण्यात वनविभाग नापास झाला आहे. आश्‍चर्याची बाब ही की, मुख्यमंत्र्यांचे पिंपळाचे झाड वगळता या मार्गावर दुतर्फा लावलेल्या एकाही झाडाला ट्री गार्ड नसल्याने यापैकी 90 टक्के झाडांची वाढ होवू शकली नसल्याने सामाजिक वनिकरण विभागाचा कारभारावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ राज्यात 3 ते 9 जून 2015 पर्यंत पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घुसर येथील घुसर ते सांगळुद रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड करून केला होता. यावेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. सामाजिक वनीकरण विभागाकडे या मोहिमेची जबाबदारी होती. 

वृक्षारोपण मोहिमेवर लाखो रूपये खर्चूनही मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षापूर्वी लावलेले रोपटे 24 महिन्यात 12 फूटही वाढू शकले नाही. वृक्षारोपण मोहिमेसाठी लाखो रूपये खर्च झाले आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पिंपळाला फक्त ट्री गार्ड लावले. मात्र घुसर ते सांगळूद या सात किलोमीटर रस्त्यावर लावण्यात आलेल्या एकाही रोपट्याला ट्री गार्ड नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते वृक्षारोपण केलेल्या उपक्रमाचा नामफलकही या ठिकाणाहून गायब झाला आहे. शिवाय थातूरमातूर सिमेंटचा ओटा बांधून इव्हेंट केल्याचा प्रकार याबाबतीत घडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात झालेल्या वृक्षारोपणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. 

यावर्षी लागणार साडेसहा लाख झाडे 
यावर्षी सहा लाख 40 हजार झाडे लावण्याचे उद्दीष्ट आहे. वनविभागामार्फत दरवर्षी पाच लाख झाडे लावण्यात येतात. मात्र प्रत्यक्षात किती झाडे जगतात हा प्रश्नच आहे. एकदा थाटामाटात वृक्षारोपण केले की, संबधीत लोकप्रतिनिधी सुद्धा त्याकडे पुन्हा पाहत नसल्याने ही अवस्था निर्माण झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com