13 sugar mills flout ban & start sugarcane crushing | Sarkarnama

परवाना नसतानाही 13 कारखान्यांकडून उसाचे गाळप सुरु !

सरकारनामा
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

महाराष्ट्रात यंदाच्या हंगामासाठी 143 साखर कारखान्यांना  गाळप परवाना मिळाला असून आतापर्यंत उसाचे  गाळप  140.74 लाख मेट्रिक टन तर  साखर उत्पादन 134 लाख क्‍विंटल  झाले आहे .  

सोलापूर  : यंदाचा साखर गाळप हंगाम 20 ऑक्‍टोबरपासून सुरू झाला आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांना एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांना यंदा साखर आयुक्‍तांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गाळप परवानाच दिला नाही. मात्र, परवान्याची वाट न पाहता उसाचे थेट गाळप करणाऱ्या कारखान्यांवर साखर आयुक्‍तांनी कारवाईचा बडगा उगारला असून, राज्यातील 13 कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 

साखरेचे दर घसरले, निर्यातीच्या धोरणाला विलंब लागला यासह अन्य कारणांमुळे कारखानदारांनी मागील गाळप हंगामात शेतकऱ्यांना एफआरपी दिली नाही. काही कारखान्यांनी उशिराने एफआरपी दिली. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांची एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांना यंदाच्या हंगामात गाळप परवानाच देण्यात आला नाही. 

तरीही सोलापूरसह राज्यातील 13 कारखान्यांचे गाळप सुरूच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार साखर आयुक्‍त संभाजी कडू-पाटील यांनी या कारखान्यांना नोटीस बजावली असून, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटना याचिका दाखल करणार असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. 

नोटीस दिलेले कारखाने 
सोलापूर जिल्ह्यातील मकाई, मातोश्री, संत दामाजी, सिद्धेश्‍वर, जयहिंद व गोकूळ शुगर यांच्यासह अन्य जिल्ह्यांमधील जय श्रीराम शुगर, पूर्णा, भीमाशंकर शुगर, वसंतदादा शुगर, भाऊराव चव्हाण साखर कारखाना, अचनी शुगर, निपाडचा केजीएस शुगर या कारखान्यांना परवाना नसतानाही गाळप घेतल्याप्रकरणी नोटीस बजावल्याचे साखर आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले. 

 

संबंधित लेख