सागर नाइकांच्या राजकीय पुनर्वसनात अडथळे

सागर नाइकांच्या राजकीय  पुनर्वसनात अडथळे

नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर नेते गणेश नाईक यांचे पुतणे व नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक यांच्या नवी मुंबई महापालिका सभागृहातील पुनरागमनास व राजकीय पुनर्वसनास एकामागून एक अडथळे सुरू झाले आहेत. सागर नाइकांना पुन्हा नगरसेवकपदी पोटनिवडणुकीच्या माध्यमातून सभागृहात आणून महापौर करण्याच्या खेळीबाबत नवी मुंबईकरांकडून नाराजीचा सूर आळविला जावू लागला आहे. पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये घराणेशाहीचे वारे वाहू लागल्याचे तसेच बोनकोडेला महापौरपदाशिवाय करमत नसल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे. 
नवी मुंबईच्या महापौरपदाकरता ऑक्‍टोबर 2017 मध्ये निवडणूक होत असून सागर नाइकांना पोटनिवडणुकीच्या माध्यमातून सभागृहात आणण्याच्या हालचालींना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून वेग आला असून त्यासाठी थेट बोनकोडे, कोपरखैरणे ते थेट सोयरीक असलेल्या करावे गावापर्यतचीही राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून चाचपणी सुरू झाली आहे. 
करावेतील विनोद म्हात्रेंच्या प्रभागाची चाचपणी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून झाली असून विनोद म्हात्रेंनीही राजीनाम्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तथापि या प्रभागातून सागर नाइकांना निवडणूक लढविल्यास विजय सोपा नसल्याची खात्री झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने या प्रभागाचा विचार सोडून दिला आहे. बोनकोडेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुस्लिम समाजाचे युवा नगरसेवक मुनवर पटेल तसेच कोपरखैराणेतील नगरसेवक लीलाधर नाईक यांच्याही प्रभागाची चाचपणी राष्ट्रवादी कॉंग्र्रेसकडून झाली असली तरी दोन्ही नगरसेवकांनी राजीनामा देवू नये यासाठी या दोन नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांकडून व समर्थकांकडून तसेच समाजबांधवांकडून उघडपणे विरोध होवू लागल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अन्य सुरक्षित प्रभागाचा शोध सुरू झाला आहे. 

सागर नाइकांच्या राजकीय पुनर्वसनाकरिता बोनकोडेतील मुनवर पटेलांना राजीनामा देण्यास भाग पाडले जाणार असल्याचे वृत्त बोनकोडेतील मुस्लिम समाजाला समजताच मुनवरने राजीनामा देवू नये अशी भूमिका मुस्लिम समाजातील अनेकांनी उघडपणे घेतली आहे. मुनवर महापालिका सभागृहात युवा नगरसेवक असून त्यांच्या माध्यमातून मुस्लिम समाजाचे ठळकपणे अस्तित्व पहावयास मिळत आहे. यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसने जब्बार खान तसेच सिराजभाई यांना महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देताना मुस्लिम समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि मुनवर निवडून आलेले नगरसेवक असून त्यांनी राजीनामा देवू नये याकरिता मुस्लिम समाजाचा दबाव वाढत चालला आहे. 

लीलाधर नाईक यांनीही राजीनामा देवू नये असा सूर तेथील स्थानिक ग्रामस्थांकडून आळविला जावू लागला आहे. 
जो नगरसेवक सागर नाईकांसाठी आपल्या पदाचा व प्रभागाचा त्याग करेल त्याचे पालिका सभागृहात स्वीकृत नगरसेवक म्हणून पुनर्वसन करण्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निश्‍चित करण्यात आले आहे. त्याग करणाऱ्या नगरसेवकाच्या सभागृहातील पुनर्वसनासाठी महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक व गणेश नाइकांचे कडवट अनुयायी कुकशेतचे सूरज बाळाराम पाटील यांचा राजीनामा घेण्यात येणार आहे. सूरज पाटलांचे परिवहन समितीवर पुनर्वसन करण्यात येणार आहे. 

सागर नाइकांच्या पुनर्वसनासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुरू असलेल्या काही दिवसापासूनच्या हालचाली नवी मुंबईच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रापासून लपून राहिलेल्या नाहीत. सागर नाइकांच्या माध्यमातून नाईक परिवार पुन्हा एकवार घराणेशाही लादू पाहत असल्याचा नाराजीचा सूर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांकडून आळविला जावू लागला आहे. या राजकीय घडामोडीचे पडसाद नवी मुंबईकरांमध्ये उमटू लागले असून रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका युवा नगरसेवकाच्या घरी शिवसेनेकडून मटनाची देण्यात आलेल्या भेटीची खमंग चर्चा सोमवारी नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. सागर नाइकांना महापौरपदी विराजमान करण्याकरिता राष्ट्रवादी कॉंग्रेस या नगरसेवकाला राजीनामा देण्यास भाग पाडून पोटनिवडणूक घेणे, स्वीकृत नगरसेवकाचा राजीनामा घेणे याकरिता पडद्यामागून सुरू झालेल्या हालचालींमुळे जनसामान्यांमध्ये नाइकांच्या घराणेशाहीविषयी टीकात्मक सूर आळविला जावू लागला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com